या योजनेमुळे महिला सक्षम व स्वावलंबी बनतील
योजनेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचे आ. राणे यांनी केले कौतुक : पूर्ण झालेल्या कामाचे श्रेय सेविकांचेच
वैभववाडी पं. स. येथे माझी लाडकी बहीण योजना आढावा बैठक संपन्न
वैभववाडी | प्रतिनिधी : महायुती शासनाची लाडकी बहीण योजना माता भगिनींना निश्चित सक्षम व स्वावलंबी बनवेल. वैभववाडी तालुक्यात या योजनेचे काम सर्वांनी एकजुटीने करा. या योजनेचा लाभ तळागाळातील माता-भगिनींना झाला पाहिजे. या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या. तालुक्यातून लवकरात लवकर शंभर टक्के योजनेची अंमलबजावणी करा. अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी येथे आढावा बैठकीत केल्या.
वैभववाडी पंचायत समितीच्या सभागृहात माझी लाडकी बहीण या योजने संदर्भात आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. यावेळी कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर, वैभववाडी गटविकास अधिकारी श्री. जंगले, तहसीलदार सूर्यकांत पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी सौ. काकडे, मुख्याधिकारी सुरज कांबळे व तालुक्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैभववाडी तालुक्यात लाडकी बहीण योजनेचे काम उत्साही उत्कृष्टपणे करणा-या तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांचे आमदार नितेश राणे यांनी आभार मानले. पुर्ण झालेल्या कामाचे सर्व श्रेय हे त्यांचे आहे असे यावेळी त्यांनी सांगितले. ज्या ज्या गावांना नेटवर्क संदर्भात किंवा इतर अडचणी असल्यास त्याबाबत सक्षम अधिकारी आपल्याला पूर्ण मदत करतील. या योजनेची सकारात्मक स्पर्धा असावी, यासाठी देवगड प्रमाणे या तालुक्यात ही सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गावांना निधीची घोषणा केली. तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविणा-या गावाला 25 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला 15 लाख रुपये, तर तृतीय क्रमांकाला 10 लाख रुपयांचा विकास निधी देणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
उर्वरित प्रस्ताव लवकर पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील सर्व सरपंच यांनी अंगणवाडी सेविकांना व प्रशासनाला सहकार्य करावे अशा सूचना यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिल्या.
प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी तालुक्यात एकूण लाभार्थी पात्र संख्या 7604 इतकी असल्याचे सांगितले. ऑफलाईन झालेले लाभार्थी 5200 असल्याचे सांगितले. सफेद रेशन कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे कातकर यांनी सांगितले. परंतु त्यांचे अडीच लाखापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला अपेक्षित असल्याचा त्यांनी सांगितले. 1 ऑगस्ट पासून ऑनलाईन करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायत स्तरावर वाचन करणार असल्याचे कातकर यांनी सांगितले.
माझी लाडकी बहीण ही विशेष योजना राबवणाऱ्या महायुती सरकारच्या अभिनंदनचा ठराव प्रमोद रावराणे यांनी मांडला. यावेळी सर्व अधिकारी, ग्रामसेवक कर्मचारी आदी उपस्थित होते.










