वैभववाडी रेल्वे स्टेशनवरती प्रवाशांना दर्जेदार सुविधा द्या – आमदार नितेश राणे

कणकवलीप्रमाणेच वैभववाडी स्टेशन महत्त्वाचे

सुविधांकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यास गय करणार नाही

आ. नितेश राणे यांनी वैभववाडी रेल्वे स्टेशनला दिली भेट : समस्या घेतल्या जाणून

वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी रेल्वे स्टेशनवरून देवगड, गगनबावडा, वैभववाडी व अन्य तालुक्यातील प्रवासी प्रवास करतात. या स्टेशन परिसरात गावांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रवासी संख्या ही तुलनेने जास्त आहे. कणकवली स्टेशन इतकंच हे स्टेशन देखील महत्त्वाचे आहे. या स्टेशन वरील सोयी सुविधांकडे अधिकाऱ्याने दुर्लक्ष करू नये, दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड दम आमदार नितेश राणे यांनी दिला.

वैभववाडी रेल्वे स्टेशन याठिकाणी स्टेशन संदर्भात प्रलंबित विषय व विविध मागण्या संदर्भात आढावा बैठक आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी भाजप मंडळ अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, नेहा माईणकर, प्राची तावडे, सुधीर नकाशे व मोठ्या संख्येने पदाधिकारी, रेल्वे प्रवासी, ग्रामस्थ, रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.

रेल्वे ट्रॅक वरील ब्रिजचे काम मंजूर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर काम त्वरित चालू करा अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या. सदर काम लवकरच सुरू करतो अशी ग्वाही अधिकारी यांनी दिली. रेल्वे स्टेशन समोरील रिक्षा स्टॅन्ड नजीकचे सर्कल काढून टाकण्यात यावे, सदर काम देखील लवकर केले जाईल असे सांगितले. रिक्षा चालकांना रिक्षा स्टँड उपलब्ध करून देण्याच्या सूचना आमदार नितेश राणे यांनी केल्या. रेल्वेचे अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्याशी कोणताही समन्वय ठेवत नसल्याचे आ. नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली.

खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून प्रलंबित विषय मार्गी लावण्यात येतील असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
या रेल्वे स्टेशनला कोणी वाली नाही असे अधिकाऱ्यांनी समजू नये, अधिकाऱ्याने आपल्या कामात सुधारणा करावी व विभागाच्या अखत्यारीत येणारे विषय तात्काळ सोडवण्यात यावे अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी केल्या. रेल्वे स्टेशन वरील शेड, पाणी पुरवठा, रस्ते, शौचालय व आरक्षण कोटाबाबत लवकरच मार्ग निघेल, असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. यावेळी रिक्षा संघटनेच्या वतीने आमदार नितेश राणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.