बुधवार दि.२४ जुलै सायंकाळी फोंडाघाट-कोल्हापूर मार्गावर एक अपघात झाला. या अपघातात दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाले. सोनवडे तर्फ कळसुली दुर्गानगर (ता.कुडाळ) येथील सचिन चंद्रकांत राणे (वय, २३ वर्षे) व सुजल चंद्रकांत राणे (वय, २०) वर्षे हे दोघेही कोल्हापूरात पाणी भरल्याने गावी परत येण्यासाठी निघाले होते. मागील आठवडाभर महाराष्ट्रातील विविध भागामध्ये तुफान पाऊस कोसळत आहे. यामुळे घराबाहेर पडणं कठीणच होतं. परंतु माणसाला गरीबी नेहमी अस्वस्थ करते. सुजल आणि सचिन हे दोघेही कामासाठीच कोल्हापूरला गेले होते. परंतु सचिन ज्या कोल्हापूरातील हॉटेलमध्ये काम करत होता त्या भागात पाण्याने वेढा घातला होता. यामुळे हॉटेल बंद ठेवण्याशिवाय मालकांना दुसरा पर्यायच नव्हता. यामुळे सचिन आणि सुजलने घरी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. बाहेर मुसळधार पाऊस होता. फोंडाघाटातील अभयारण्य भागातील मांढरेवाडी शेळप दरम्यान या दोन्ही भावांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या दोघांच्याही डोक्यावरून गाडी गेली. त्यात जाग्यावरच त्यांचा मृत्यू झाला. ज्या अज्ञात वाहनाने सचिन आणि सुजलला धडक दिली. त्या वाहनाचा अद्यापपर्यंत तरी शोध लागलेला नाही. राधानगरी पोलिस स्टेशनचे पोलिस या अपघाताचा शोध घेतील अशी अपेक्षा आहे. या दुर्दैवी अपघाती घटनेनंतर सोनवडे तर्फ कळसुली दुर्गानगरमधील सचिन, सुजलच्या घरी कुटुंबावर फारमोठा आघात झाला आहे. दोन मुलगे गमावल्यानंतर आई-वडिलांच्या स्वप्नांचा पार चुराडा झाला आहे. दोन मुलगे आपला आधार बनतील या विश्वासाने राणे कुटुंब होते. वीस आणि तेवीस वर्षाच्या मुलांमध्ये कोणतेही आई वडील आपले भविष्य पहात असतात. परंतु भविष्यातील सुखाच्या कल्पनांना या दोन्ही भावांच्या अपघातील मृत्यूने धक्काच दिला आहे. त्यादिवशी पाऊस भरपूर पडत असल्याने सचिन आणि सुजलचे वडील चंद्रकांत राणे यांनी या पावसातून गावी लगेच येऊ नका तर मामाकडे थांबा आणि उद्या या असे सांगितले होते. परंतु आपण सोनवडे दुर्गावाडीतील आपल्या घरी वेळेत पोहोचू असं त्या दोघांनाही वाटले असावे. यामुळेच त्या दोघांनाही वाटेत मामाकडे न थांबता
घर गाठण्याचा प्रयत्न केला असावा. कोणाच्याही जीवन प्रवासात जर-तरला काहीच अर्थ नसतो. जर-तरला काही किंमतही नसते. परंतु सचिन राणे आणि सुजल राणे या दोघांच्या बाबतीत काळही आला होता. आणि वेळही आली होती. म्हणूनच कोल्हापूरात ज्या हॉटेलमध्ये सचिन कामाला होता त्या हॉटेल परिसरात पाणी भरले होते. वडीलांनी मामाकडे जायला, थांबायला सांगितलेले असतानाही सचिन आणि सुजल दोघेही गावी यायला निघाले. यामुळे त्यांची वेळही आली होती. त्यांचा मृत्यू हा अपघाती व्हायचाच होता.याचे कारण अपघात इतका जबरदस्त होता की त्या दोघांवरही वैद्यकिय उपचार होणेही अवघड बनले होते. या अपघाताने दुर्गावाडीतील चंद्रकांत राणे कुटुंबावर फार मोठा आघात झाला आहे. मात्र, राधानगरी पोलिसांसमोर ते अज्ञात वाहन शोधून काढण्याचे फार मोठे आव्हान आहे.










