सागरी महामार्गावरील दांडे येथील पूल हलक्या वाहनांसाठी वाहतुकीसाठी खुला

 

अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी गणपतीपर्यंत वाट बघावी लागणार..

राजकीय पुढार्‍यांची श्रेयासाठी धडपड…

जैतापूर (वार्ताहर): गेली अनेक वर्षे दुरूस्तीअभावी रखडलेल्या सागरी महामार्गावरील दांडे येथील पूल दुरूस्तीनंतर हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आला असून अद्यापही काही काम शिल्लक असल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी गणपतीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

राजापूर तालुक्यातील सागरी महामार्गावरून जाणाऱ्या दांडे येथील सागरी पूल गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला होता.सुमारे दहा ते बारा वर्षांपूर्वी बांधलेल्या या पूलाचा एक पिलर तीन-चार वर्षातच खचला होता . याचा परिणाम संपूर्ण पुलावर एका बाजूला भार येत होता. त्या भाराने संपूर्ण पूल पडू नये यासाठी प्रशासनाकडून अवजड वाहनांसाठी हा पूल बंद करण्यात आला होता. त्यानंतर ही जवळपास तीन-चार वर्षे या पुलावरून एसटीची वाहतूक वगळता सर्व वाहतूक अनधिकृतपणे सुरू होती.

पिलर च्या दुरुस्तीसाठी सुरुवातीला सुमारे पाच कोटी रुपयांची आवश्यकता होती. मात्र तो निधी वेळेवर न मिळाल्याने त्यामध्ये वाढ होऊन जवळपास आठ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता.शासनाकडून हा निधी उपलब्ध झाल्यानंतर आणि सर्व प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाल्यानंतर मार्च 2023 रोजी या पुलाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात झाली.

दोन ते तीन महिन्यांमध्ये या पुलाचे काम पूर्ण होऊन पूल वाहतुकीस सुरू होईल असे सांगण्यात आले होते. मात्र या पुलाचे काम जवळपास दीड वर्ष सुरू होते. दरम्यानच्या काळात परिसरातील लोकांकडून आणि वाहन चालकांकडून लवकरात लवकर पूल दुरुस्त होऊन वाहतूक सुरू व्हावी अशी मागणी वारंवार होत होती. मात्र कोणत्याही राजकीय पक्षाच्या पुढार्‍याने यासाठी काही विशेष प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले नाही. मात्र आता जवळपास दीड वर्षानंतर या पुलाचे काम पूर्ण होत असताना अनेक राजकीय पक्षांच्या पुढार्‍यांची श्रेयवादासाठी चढाओढ आणि आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत .

आपण आणि आपल्या नेत्यानेच कसा हा पूल मार्गी लावला हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियातून धडपड सुरू आहे.

जर कोणत्याही राजकीय पक्षाच्या पुढार्‍यांनी पुढाकार घेऊन या पुलाचे काम दोन ते तीन महिन्यात पूर्ण करून घेतले असते आणि पूल तात्काळ वाहतुकीस खुला केला असता ते शंभर टक्के त्यांना श्रेय घेता आले असते. मात्र ठेकेदाराने त्याच्या अडचणी आणि वेळ याचा पुरेपूर सांगड घालत आता जवळपास दीड वर्षानंतर या पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे.मात्र तरीही अजूनही हा पूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेला नाही या दुरुस्ती केलेल्या पुलावर आणि जोड रस्त्याचे डांबरीकरण अजून बाकी असून हे काम पावसाळ्यानंतरच होणार आहे. मात्र तोपर्यंत पर्यंत हलक्या वाहनांना वाहतुकीची मुभा देण्यात आली असून. एसटी आणि अन्य अवजड वाहतुकीसाठी गणेशोत्सवापर्यंत प्रतीक्षा करावा लागणार आहे.