राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्यातील सागरी महामार्गावरून जाणाऱ्या दांडे येथील सागरी पूल गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला होता. सुमारे दहा ते बारा वर्षांपूर्वी बांधलेल्या या पूलाचा एक पिलर तीन-चार वर्षातच खचला होता. हा पूल धोकादायक असल्याने आणि वाहतूक बंद ठेवल्याने लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती व्हावी अशी मागणी या परिसरातील लोकांनी तत्कालीन आमदार म्हणून आपल्याकडे केली होती. त्याप्रमाणे आपण बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती आणि निधीची मागणी केली होती. चंद्रकांतदादा यांनी तात्काळ या पुलासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर केला होता.
मात्र त्यानंतर प्रशासकीय मंजुरी मध्ये जास्त वेळ गेल्याने या कामाचे इस्टिमेट वाढून ते आठ कोटीपर्यंत गेले त्यानंतर आपण तत्कालीन बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे वाढीव निधीची मागणी केली त्यांनी ती मंजूर केल्यानंतर या कामाला सुरुवात झाल्याचे तत्कालीन विधान परिषद सदस्य आणि माजी आमदार हुस्नबानु खलीफे यांनी म्हटले आहे.
या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्यानंतर ते काम जवळपास दीड वर्षे रखडले होते. दांडे पुलाला भेट देत पुलाचे पाहणी केली. त्यावेळी आता काम सुरू झाल्यानंतर सर्वच पक्षाचे पुढारी काम पूर्ण केल्याच्या श्रेयवादासाठी धडपडत असल्याबद्दल विचारले असता आपण या श्रेय वादात पडणार नाही. आपल्या परिसरातील कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीनुसार तत्कालीन बांधकाम मंत्र्यांकडे निधीसाठी मागणी केली होती आणि त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नामदार चंद्रकांत दादा पाटील आणि नामदार अशोकराव चव्हाण यांचे ऋणी असल्याचे स्पष्ट केले आहे.
लोकांसाठी हा मार्ग पुन्हा एकदा खुला होत आहे याचे आपल्याला समाधान असून प्रत्यक्षात या कामाला विलंब झाला आहे हे मान्य करावेच लागेल या श्रेय वादात अजिबात पडणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
माजी आमदार हुस्नबानु खलीफे यांनी दांडे पुलाची पाहणी केली. त्यावेळी तालुका काँग्रेसचे ज्येष्ठ शरफुद्दीन काझी, सागवे विभाग अध्यक्ष वैभव कुवेसकर, जैतापूरचे सरपंच राज्यप्रसाद राऊत, प्रमोद गावकरआदी उपस्थित होते.










