वैभववाडी l : मांगवली गावाला सुरळीत विजपुरवठा होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी भुईबावडा येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियत्यांना घेराओ घातला. यावेळी ग्रामस्थांनी महावितरणच्या बेजबाबदारपणे सुरू असलेल्या कारभारावर टिका केली. विजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
मांगवली गावाला गेल्या काही दिवसांपासुन सुरळीत विजपुरवठा होत नाही. सातत्याने गावातील नागरिकांनी महावितरणला यासंदर्भात कल्पना दिली. परंतु महावितरणच्या कारभारात कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे आज मांगवलीचे सरपंच शिवाजी नाटेकर, माजी सरपंच राजेंद्र राणे, माजी सरपंच महेश संसारे, संतोष ईस्वलकर, मधुकर आयरे, वसंत नाटेकर, दिलीप कोलते, मंगेश कोलते, सचिन आयरे, प्रवीण राणे, प्रकाश वाडेकर यांनी भुईबावडा येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंता अजित नेरले यांना घेराओ घातला.
मांगवली गावात सतत विज पुरवठा खंडित होत आहे. याबाबत गेल्या काही दिवसांपासुन आम्ही तुमच्याकडे तक्रार करीत आहोत, परंतु तुमच्याकडुन कसलाही प्रतिसाद मिळत नाही. विजेच्या लंपडावाचा गावाच्या नळपाणी पुरवठा योजनेवर परिणाम होत आहे. भुईबावडा उपकेंद्रातुन हेत, मांगवली, मौद, जांभवडे या गावांना विजपुरवठा होतो. हेत येथुन मांगवलीला विजप्रवाह येतो. परंतु ज्यावेळी हेत पुढील गावांमध्ये तांत्रिक अडचण येते. त्यावेळी मांगवलीचा विजपुरवठा बंद करावा लागतो. त्यामुळे जांभवडे, मौदेला भुईबावडा उपकेंद्रातुन थेट पुरवठा करावा आणि मांगवलीला आखवणे-भोम पुर्नवसन गावठणातुन विजपुरवठा करण्यात यावा जेणेकरून गावाला पुर्ण क्षमतेने विजपुरवठा होऊ शकेल. परंतु महावितरणकडुन कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे जर मांगवली गावात सुरळीत विज पुरवठा झाला नाही तर आम्ही उग्र आंदोलन छेडू असा इशारा ग्रामस्थांनी आज महावितरणला दिला.












