करुळ येथे माघी गणेश जयंती निमित्त स्पर्धेचे आयोजन
वैभववाडी l प्रतिनिधी : करुळ भोयडेवाडी येथे माघी गणेश जयंती निमित्त पार पडलेल्या राज्यस्तरीय ढोलवादन स्पर्धेत पवार मंडळ दिवटेवाडी राजापूर संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या ढोलवादन स्पर्धेला तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते, आरोग्यदूत वीरेंद्र उर्फ बंटी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा बँक माजी संचालक दिगंबर पाटील, सरपंच नरेंद्र कोलते, उपसरपंच सचिन कोलते, तंटामुक्ती अध्यक्ष बबन सावंत, मंडळाचे अध्यक्ष हिंदुराव पाटील, मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री. अशोक टक्के, शिक्षक चंद्रकांत पाटील, सह्याद्री जीव रक्षक हेमंत पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. या ढोलवादन स्पर्धेत द्वितीय क्रमांक धूतपापेश्वर ढोलपथक राजापूर व नवलादेवी ढोलपथक शेडे राजापूर यांनी पटकावला. तर तृतीय क्रमांक नवशामारुती ढोल पथक देवगड यांनी पटकावला. उत्तेजनार्थ क्रमांक रामेश्वर तळगाव राजापूर या संघाने पटकावला. उत्कृष्ट झांज वादक म्हणून नवलादेवी ढोलपथक राजापूर, उत्कृष्ट ताशा ढोलपथक शेडे राजापूर, उत्कृष्ट ढोलवादन धूतपापेश्वर राजापूर या संघाने पटकावला. प्रथम क्रमांकास दहा हजार रुपये, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास सात हजार रुपये व सन्मानचिन्ह तसेच इतर विजेत्यांना रोख रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सहभागी संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेला पंच म्हणून राजू कुलकर्णी राजापूर, तानाजी मासये, व श्री करंदीकर सर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी रामेश्वर युवा मित्र मंडळ भोयडेवाडीच्या सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. माघी गणेश जयंती निमित्त मंदिरात दिवसभर विविध कार्यक्रम पार पडले. सकाळी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले, या शिबिराचा लाभ अनेक जणांनी घेतला. तसेच गावचे सुपुत्र व कोल्हापूर सीपीआर रुग्णालय येथे आरोग्यदूत म्हणून सेवा बजावणारे वीरेंद्र उर्फ बंटी सावंत यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच सौ. सुमित्रा सत्यवान कांबळे यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
गणेश जयंती निमित्त मंदिरात पूजा, अभिषेक, आरती, गा-हाणी, नवस बोलणे फेडणे, महाप्रसाद, भजने, पालखी मिरवणू आधी कार्यक्रम पार पडले. गणेश जयंती निमित्त दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.












