‘त्या’ विदेशी महिलेच्या पती विरोधात अखेर गुन्हा दाखल

‘त्या’ विदेशी महिलेच्या पती विरोधात अखेर गुन्हा दाखल

सदर महिला मनोरुग्ण असल्याची माहिती

बांदा (प्रतिनिधी) :
रोणापाल जंगलात सापडलेल्या अमेरिकन महिलेच्या जबाबवरून तिचा पती सतीश याच्या विरोधात बांदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. बांदा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेक्षण विभागाची दोन संयुक्त पथके तामिळनाडू येथे काल पोचली. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग पोलीस पथक मुख्य संशयिताच्या मागावर आहे. मंगळवारी बांदा पोलिसांनी घटनास्थळी पुन्हा एकदा ‘ईन कॅमेरा’ पाहणी केली. यावेळी महिलेकडे सापडलेला मुद्देमाल बांदा पोलिसांनी ताब्यात घेतला. सदर महिला मनोरुग्ण असून तिच्यावर मुंबई, दिल्ली व गोव्यात उपचार झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

रोणापाल येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या त्या अमेरिकन महिलेचा सोमवारी बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी गोवा बांबोळी रुग्णालयात जाऊन जबाब नोंदविला. जबाबात तिने आपला पती सतीश (पूर्ण नाव समजले नाही) याने आपल्याला जीवे मारण्यासाठीच याठिकाणी आणून जंगलात बांधून ठेवल्याची माहिती दिली. तिची प्रकृती आता सुधारत असून तिच्या बंद झालेल्या जबड्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केलेत. तिच्या प्राथमिक जबाबावरून तिच्या पतीविरोधात सोमवारी रात्री उशिरा बांदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल झाल्याने पतीला ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान आता पोलीसांसमोर आहे.

सिंधुदुर्ग पोलिसांची दोन पथके तिच्या तामिळनाडू येथील मूळ पत्त्यावर तपासाकामी गेली आहेत. पतीला जेरबंद केल्यानंतरच या प्रकरणाची सत्यता समोर येणार आहे. तसेच पतीला ताब्यात घेतल्यावर त्या महिलेला कधी व कशी बांधण्यात आली हे देखील उलगडणार आहे.

अमेरिकन दुतावासाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेक्षण विभागाची संयुक्त पथके अधिक तपासासाठी गोवा व तामिळनाडू येथे गेली आहेत. तामिळनाडू येथे तपासासाठी गेलेल्या पथकाला काही महत्वाचे धागेदोरे सापडल्याने बांदा पोलिसात सोमवारी रात्री उशिरा मुख्य संशयिताविरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे.

मंगळवारी दुपारी तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले होते. त्याठिकाणी पंचांच्या साक्षीने परिसराची कसून तपासणी करण्यात आली. ही तपासणी ईन कॅमेरा करण्यात आली. त्यावेळी महिलेचा काही मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. सुरुवातीला सावंतवाडी पोलिसांनी हस्तगत केलेला मुद्देमाल अधिक तपासासाठी आज बांदा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. महिलेकडे सापडलेल्या दोन सॅक, काही चीजवस्तु बांदा पोलिसांनी पंचनामा करत ताब्यात घेतल्या.

दोन दिवसात उलगडा होणार
सिंधुदुर्ग पोलिसांची दोन पथके तामिळनाडू येथे प्रथमदर्शनी मुख्य संशयित असलेल्या पतीच्या मागावर आहेत. पोलीस पतीला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक तामिळनाडू पोलिसांचे सहकार्य घेत आहेत. पतीला ताब्यात घेतल्यानंतर दोन दिवसातच या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार आहे.

महिला मनोरुग्ण असल्याची माहिती
जंगलात सापडलेली अमेरिकन महिला ही जबाबत पोलिसांना असंदिग्ध माहिती देत आहे. जबाबत तिने पतीचे पूर्ण नाव न सांगता केवळ सतीश नाव असल्याचे सांगितले आहे. तिच्या वागण्या बोलण्यातून ती मानसिक रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. ती यापूर्वी मुंबई, दिल्ली व गोव्यात मानसिक आजारावर उपचार करून घेतल्याची माहितीही मिळाली आहे. याबाबत पोलीस अधिक माहिती घेत आहेत.

 

गोव्यातही पोलिसांचे पथक रवाना
दरम्यान, आजही पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांझुर्णे यांच्यासह पोलिसांचे पथक गोव्यात चौकशीसाठी रवाना झाले होते. स्थानिक मडुरा, सोनुर्ली, रोणापाल येथील स्थानिकांकडे देखील पोलीस चौकशी करत आहेत. एकूणच पोलिसांवर तपासाचा दबाव वाढला आहे. प्रसार माध्यमांना मात्र पोलीस काहीही माहिती देत नसून कमालीची गुप्तता पाळून आहेत.
——–