विद्यार्थ्यांनी घेतले शिक्षण सप्ताह उपक्रमांतर्गत शासकीय योजनांचे धडे….  

 

मंडणगडमधील माहू, बोरघर, तांबीटकर वाडी शाळांचा अभिनव उपक्रम     

मंडणगड l प्रतिनिधी : शासनाकडून नुकत्याच पार पडलेल्या शिक्षण सप्ताह उपक्रमांतर्गत मंडणगड तालुक्यातील माहू नं.1, बोरघर गावठण, बोरघर बौद्धवाडी, माहू तांबिटकरवाडी या शाळा व अंगणवाडय़ा यांनी एकञ येत ‘कौशल्य विकास दिवस’ अंतर्गत डिजिटल साक्षरता हा उपक्रम अनोख्या पद्धतीने राबविला. या शाळेतील विद्यार्थ्यांनी माहू येथील सरकारमान्य रास्त दराचे धान्य दुकानास भेट देऊन शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या विविध योजनांची माहिती समजावून घेतली. रास्त धान्य दुकानाच्या कार्यपद्धती विषयी माहिती घेताना विद्यार्थ्यांमध्ये कमालीचे कुतूहल होते.

विद्यार्थ्यांनी रास्त धान्य दुकानास भेट दिल्यानंतर दुकानदार रविंद्र बैकर यांनी विविध प्रकारच्या रेशनकार्डांची माहिती व त्या आधारित शासकीय सवलतींची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विविध वजनी परिमापे यांचे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले. आनंदाचा शिधा, डिजिटल प्रणालीत युपीआय पेमेंट द्वारे खरेदी, विक्रीचे व्यवहार, ऑनलाईन आर्थिक फसवणुक याबाबत विद्यार्थ्यांना यावेळी माहिती देण्यात आली. याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांना शासकीय योजनांची प्राथमिक माहिती मिळावी या हेतूने हा उपक्रम घेण्यात आला होता. प्रशाळांचे शिक्षक शैलेंद्र संसारे, संभाजी वाफेलकर, शरद सगरे, सुनिल गव्हाणे, शैलेंद्र संसारे, सतीश कोळेकर आदि शिक्षकांचे मार्गदर्शनाने हा उपक्रम राबविण्यात आला.

प्रशालेच्या या स्तुत्य उपक्रमाबाबत तहसीलदार श्रीधर गालीपेल्ली, गटविकास अधिकारी विशाल जाधव, गटशिक्षण अधिकारी श्री.शिंदे, केंद्र प्रमुख श्री.आटोळे, पुरवठा अधिकारी मयुर पोळ यांनी शाळांचे कौतुक केले.