साळशीतील शेतकरी सिताराम साळसकर यांचे नुकसान; परिसरात भीतीचे वातावरण
शिरगाव (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील साळशी येथील शेतकरी सिताराम महादेव साळसकर यांची गाभण गाय वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली.
साळसकर यांनी ही गाय चार दिवसांपूर्वी रानात चारण्यासाठी सोडली होती. रविवारी पारकर हे बनाचा व्हाळ येथील आपल्या काजू बागेत गेले असता त्यांना ही गाय मृतावस्थेत आढळून आली. चार दिवसांपूर्वीच वाघाच्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाल्याने गायीचे पोट फुगले होते तसेच दुर्गंधी येत असल्याने सुरुवातीला तिची ओळख पटत नव्हती. मात्र गळ्यातील घंटीवरून ही गाय सिताराम साळसकर यांची असल्याचे स्पष्ट झाले.
सध्या काजू हंगाम सुरू असल्याने बोंडू खाण्याच्या उद्देशाने ही गाय बागेत आली असावी. त्याचवेळी वाघाने तिच्या मानेवर हल्ला करून तिला ठार केले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच देवगडचे वनपाल श्रीकृष्ण परीट, वनरक्षक आप्पासो राठोड, शिरगावचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राणे तसेच साळशी पोलीस पाटील कामिनी नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी गाईचे मालक सिताराम साळसकर, प्रभाकर साळसकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.












