तळवली शेवरीफाटा ते हॉस्पिटल स्टॉप रस्त्याचे खड्डे “जैसे थे” 

 

गुहागर मनसे आक्रमक,दोन दिवसात खड्डे भरा अन्यथा वृक्षारोपणाचा प्रशासनाला इशारा

गुहागर l प्रतिनिधी :तालुक्यातील तळवली शेवरीफाटा ते हॉस्पिटल स्टॉप रस्त्याचे दुखणे गेले कित्येक वर्षे संपल्या संपत नसल्याने प्रवासी व वाहनचालक अक्षरशः हैराण झाले आहेत.चिखलमय रस्त्यातून मार्ग काढताना पूर्णपणे दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे.दरवर्षी खड्डेमय बनणाऱ्या या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी, सत्ताधारी आणि प्रशासन वारंवार दुर्लक्ष करीत असल्याने गुहागर मनसे आक्रमक झाली आहे.आगामी दोन दिवसात खड्डे न भरल्यास खड्यांमध्ये वृक्षारोपण करणार असल्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

गुहागर तालुक्यातील तळवली हे पंचक्रोशीतील गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे.बँक,पोस्ट तसेच आरोग्यवर्धीनी केंद्र अशी विविध शासकीय कार्यालये याठिकाणी आहेत.मुख्य म्हणजे कोट्यावधी निधी खर्चून याठिकाणी बांधण्यात आलेले आरोग्यवर्धिनी केंद्राकडे जाणारा हा रस्ताच दरवर्षी पावसाळ्यात आजारी पडत आहे.त्यामुळे रुग्णांना व प्रवासी वर्गाला या चिखलमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.

ऐन निवडणूकांच्या तोंडावर या रस्त्याच्या कामाबाबत अनेकवेळा आश्वासने दिली गेली मात्र प्रत्यक्षात या रस्त्याच्या कामाला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही.निवडणूका आल्या की सर्वच पक्षांकडून आश्वासने दिली जातात मात्र ही आश्वासने हवेतच विरत आहेत.विविध पक्षाचे राजकीय पुढारी असूनही रस्त्याचे दुखणे संपत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.आता या रस्त्याबाबत गुहागर मनसे आक्रमक झाली असून जर सत्ताधारी व प्रशासनाने तत्काळ या रस्त्याची डागडुजी केली नाही तर मनसेने दोन दिवसात याठिकाणी खड्डयात वृक्षारोपण करणार असल्याचा इशारा दिला आहे.यावेळी मनसे उपजिल्हाअध्यक्ष विनोद जानवळकर,गुहागर तालुकाअध्यक्ष सुनील हळदणकर मुंढर शाखाध्यक्ष सुजित गांधी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते

चौकट-

दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर मलमपट्टी केली जाते.ऐन पावसाळ्यात केल्या जाणाऱ्या मलमपट्टीने खड्डयांचे दुखणे अधिकच वाढून अक्षरशः चिखलाचे साम्राज्य पसरते.साहजिकच यामुळे प्रवासी व वाहनचालक बेजार होतात. गतवर्षी ग्रामपंचायतने ऐन गणेशोत्सवात याठिकाणी मलमपट्टी केली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले होते.गणेशोत्सवात आलेले चाकरमानी तीव्र नाराजी व्यक्त करत होते.यावर्षी भाजपच्यावतीने येथील खड्डे भरण्याचे काम नुकतेच करण्यात आले आहे मात्र चिखलाचे साम्राज्य “जैसे थे” होत असल्याने आता रोगापेक्षा इलाज भयंकर अशी अवस्था सध्या येथील रस्त्याची आहे.