गुहागर l प्रतिनिधी :घरडा केमिकल लिमिटेड लोटे कंपनी समाजातील वंचित, गरजू आणि दुर्बल घटकांपर्यंत पोहोचण्याचा आणि समाजातील अशा घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कंपनी आपल्या CSR मधून आर्थिक सहकार्य करून विविध संस्थांना वेगवेगळे उपक्रम करण्यास हातभार लावत असते. सामाजिक उत्तरदायित्वाची प्रतिमा वाढवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या कंपनीने गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे महाविद्यालयाला भरीव आर्थिक मदत करून आपला नावलौकिक जपला आहे.
गुहागर तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पाटपन्हाळे शैक्षणिक संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देतानाच सर्व सोयीनी युक्त नवीन इमारत बांधणीचे काम हाती घेतले. सन २०२० पासून नवीन इमारतीमध्ये वरिष्ठ महाविद्यालयातील अध्यापनाचे काम केले जात आहे. सदर इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या १४ हजार चौरस फुटाच्या बांधकामावर पत्र्याची शेड बांधणे आवश्यक होते. ७ हजार चौरस फुटाच्या शेडचे काम संस्थेचे अध्यक्ष मा. भालचंद्र चव्हाण यांनी मुंबईस्थित व्यावसायिक अरुण शेठ व त्यांचे सहकरी यांच्या आर्थिक मदतीतून पूर्ण केले होते. उर्वरित ७ हजार चौरस फुटाच्या शेडचे काम अपूर्ण असताना घरडा केमिकल लोटेने संस्थेला आर्थिक मदत देण्याची तयारी दाखवली. कंपनीच्या CSR विभागाचे प्रमुख पवार साहेव आणि सिव्हील विभागाचे सनगर साहेब यांनी संस्थेच्या प्रस्तावानुसार प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी संस्थेची गरज ओळखून तातडीने पत्र्याचीशेड बांधण्यासाठी कंपनी अधिकारी श्री. कुलकर्णी यांचेकडून परवानगी प्राप्त होताच पावसाळ्यापूर्वी इमारतीवर शेड बांधण्याचे काम पूर्ण केले. सदर पत्र्याच्या शेडचा लोकार्पण कार्यक्रम नुकताच महाविद्यालयात संपन्न झाला. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीम.सुचीताकाकी वेल्हाळ, संस्थेचे सचिव सुधाकर चव्हाण, सहसचिव कोळवणकर शेठ, सदस्य अनंत चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमात संस्थेच्या वतीने घरडाचे अधिकारी पवार साहेव व सनगर साहेब यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वतीने घरडा केमिकल्स ने केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कंपनीला सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.











