ओणी येथे 30 आणि 31 ऑगस्ट रोजी प्रबोधनकार ठाकरे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

 

राजापूर l प्रतिनिधी : तालुक्यातील ओणी येथील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या वतीने एकोणीसावी प्रबोधनकार ठाकरे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा 30 आणि 31 ऑगस्ट या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. ओणी हायस्कूलच्या गुरूवर्य शहाजीराव खानविलकर सभागृहामध्ये होणाऱ्या या स्पर्धेतील प्रथम तीन सर्वोत्तम विजेत्यांना प्रत्येकी सात हजार 500 रूपये बक्षिसासह ‘प्रबोधनकार युवा वक्ता पुरस्कार-2024’ देवून गौरविण्यात येणार आहे. तर, तीन उपविजेत्यांना प्रत्येकी दोन हजार रूपये आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.

 

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी मिळावी या उद्देशाने सलग 19 व्यावर्षी राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा महाविद्यालयीन (11 वी ते 15 वी., डी.एड्., बी.एड्., अभियांत्रिकी आदी.) विद्यार्थ्यांसाठी खुली असून प्रत्येक महाविद्यालयातील फक्त दोनच स्पर्धकांना स्पर्धेत भाग घेता येणार आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेताना संबंधित स्पर्धकाकडे महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे शिफारस पत्र आणि ओळखपत्र असणे गरजेचे आहे. या स्पर्धेसाठी राजकारण्यांचा धर्म आणि धर्माचं राजकारण, व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, राजकारणातील अभिनय आणि अभिनय क्षेत्रातील राजकारण, नवे शैक्षणिक धोरण-जखम मांडीला आणि मलम शेंडीला, सावधान..लोकशाहीचा चौथा खांब ढासळतो आहे.. असे पाच विषय ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी स्पर्धेची किमान सात तर, कमाल दहा मिनिटे अशी वेळ राहणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणार्‍या स्पर्धकांची प्राथमिक फेरी होवून त्या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी 21 स्पर्धकांची निवड करण्यात येणार आहे.

 

या स्पर्धेतील विजेत्यांची नेहमीप्रमाणे प्रथम, द्वितीय आणि तृतीय यासह उत्तेजनार्थ अशी पारंपारीक पद्धतीने निवड करण्यात येणार नाही. तर, तीन सर्वोत्तन स्पर्धकांची निवड करण्यात येणार असून त्यांना रोख रक्कमेच्या बक्षिसासह सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. यावेळी त्या तीनही स्पर्धकांना ‘प्रबोधनकार युवा वक्ता पुरस्कार-2024’ हा पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी शंभर रूपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले असून या स्पर्धेमध्ये सहभागी होवू इच्छिणार्‍या स्पर्धकांनी आपली नावे प्रबोधनकर ठाकरे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा, नुतन विद्यामंदीर व कनिष्ठ महाविद्यालय, ओणी, ता.राजापूर, जि.रत्नागिरी येथे 28 ऑगस्टपर्यंत नावनोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. राज्यातील विविध महाविद्यालयातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष वासुदेव तुळसणकर यांनी केले आहे. या स्पर्धेसंबंधित अधिक माहितीसाठी प्रा. विनोद मिरगुले (मो.9970953600) यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन श्री. तुळसणकर यांनी केले आहे.