मडूरा नाबर प्रशालेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप
बांदा | प्रवीण परब : शिकून पुढे काय बनायचे आहे ते आताच निश्चित करा. वहीच्या एका पानावर आपले ध्येय लिहून रोज त्याचे वाचन करा. भरपूर अभ्यास व मेहनत करून तुमचे स्वप्न पूर्ण करा. मोठे झाल्यानंतर शाळेला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घ्या आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी योगदान द्या, असे आवाहन अर्चना फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी मडूरा येथे केले.
मडूरा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशालेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष सौ. अर्चना परब यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ॲड. सायली दुभाषी, सावनी पाटकर, सुनीता भाईप, संजय भाईप, सुरेश गावडे, प्रकाश वालावलकर, लक्ष्मण गवस, घनश्याम वालावलकर, वैभव परब आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापिका प्रतीक्षा शिरोडकर यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याची विस्तृत माहिती दिली. ॲड. सायली दुभाषी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सौ. अर्चना परब यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षिका नीती साळगावकर, वेलांकनी फर्नांडीस, तेजस्वी गावडे, शिवानी चांदेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्वी गावडे यांनी तर आभार प्रदर्शन शिवानी चांदेकर यांनी केले.










