वेंगुर्ले येथे मुख्याध्यापक व गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार संपन्न..
भाजपाच्या वतीने आम. निरंजन डावखरे यांचा करण्यात आला सत्कार..
वेंगुर्ला l दाजी नाईक :दिवसेंदिवस शिक्षणाची पद्धत बदलत आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षणापासून च आपण जे शिक्षण घेतो ते पुढील रोजगाराचे लक्ष ठेऊन घेणे आज काळाची गरज आहे. याच धरतीवर केंद्र आणि राज्य शासनाकडूनही शिक्षणामध्ये कौशल्य विकास कार्यक्रमाकडे भर दिला जात आहे. कोकणात फळ प्रक्रिया उद्योगाला खूप वाव आहे. त्याकडेही रोजगाराचे साधन म्हणून पाहिल्यास नुकसान होणार नाही. या प्रक्रिया केलेल्या मालाला पॅकिंग आणि मार्केटिंग मिळवून देण्यासाठी माझा प्रयत्न राहील असे आश्वासन पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार निरंजन डावखरे यांनी वेंगुर्ले येथे बोलताना दिले आहे.
भाजपा वेंगुर्ला व कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ला तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार सोहळा आणि दहावीत शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सन्मान आज येथील स्वामिनी मंडपम येथे संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करताना आम. डावखरे बोलत होते. या कार्यक्रमाला व्यासपीठावर माजी आमदार राजन तेली, भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, कोकण कला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, भाजप कार्यकारणी सदस्य शरद चव्हाण, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, ॲड. सुषमा खानोलकर, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, तसेच साईप्रसाद नाईक, निलेश सामंत, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, वसंत तांडेल, वेंगुर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य एम बी चौगुले व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर वेंगुर्ले तालुका भाजपाच्या वतीने आमदार डावखरे यांचा भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यात प्रथम शाळांचा त्यानंतर दहावी आणि बारावी परीक्षेत वेंगुर्ला तालुक्यातील सर्व प्रशालेतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी आणि ५ वी आणि ८वी मधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना राजन तेली म्हणाले की, आता आपल्या जिल्ह्यात गुणवंत विद्यार्थी आहेत. त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी पुढे घेऊन येण्याकरिता प्रशिक्षण केंद्रे उभी राहणे गरजेचे आहेत. जिल्ह्यात १३ वर्ष दहावी परीक्षेत आपली मुले नंबर एकला आहे. गुणवत्तेतील हा सिंधुदुर्ग पॅटर्न नोकरीतही कसा राहील यासाठी एक वेगळी बैठक घेऊन त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कोकण कला शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी बोलताना विद्यार्थ्यांनी सतत मेहनत करून यश मिळवावे असे सांगितले. तर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी नियमित शिक्षणाबरोबरच कौशल्य विकासाकडेही लक्ष द्यावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. सचिन परुळकर यांनी मानले.












