महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी कामाला लागा : कार्यकर्त्यांना आवाहन
सावंतवाडीत भाजपची विस्तारित जिल्हा कार्यकारणी बैठक संपन्न
खासदार नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा सत्कार
सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्याला २०४७ साली १०० वर्ष होत असताना भारत एक विकसित देश असणार आहे. त्यादृष्टीने आपले पंतप्रधान काम करत आहेत. त्यांनी २५ कोटी लोकांची गरिबी दूर केली. ८० कोटी लोकांना अन्नपुरवठा केला, पुढेही करणार. महिला, तरूण, विद्यार्थांना शेकडो योजना त्यांनी दिल्यात. नरेंद्र मोदी हे जगात एकमेव असे पंतप्रधान आहेत. असे असताना अडीच वर्षात जे काहीही करू शकले नाहीत ते उद्धव ठाकरे व त्यांचे सहकारी उठसूट टीका करीत आहेत. मात्र, यापुढे त्यांनी आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहांबद्दल टीका केल्यास ते खपवून घेणार नाही जशास तसे उत्तर दिले जाईल, असा सज्जड इशारा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी दिला.

सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजित विस्तारीत जिल्हा कार्यकारीणी बैठकीचे उद्घाटन खासदार नारायण राणे यांच्या हस्ते भाजपचा झेंडा फडकवून तसेच व दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगांवकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले, विशाल परब, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, एकनाथ नाडकर्णी, प्रसन्न देसाई, सुधीर दळवी, दादा साईल, रविंद्र मडगांवकर, पुखराज पुरोहित, प्रमोद रावराणे, राजू राऊळ, मनोज नाईक, आदी उपस्थित होते.
ते म्हणाले,लोकसभा निवडणुकीतील माझा विजय हे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचं श्रेय आहे. कारण कार्यकर्ता हेच भाजपचं सैन्य आहे. इतर पक्षांपेक्षा आपला कार्यकर्ता तरबेज आहे. कार्यकर्ता या शब्दाचा अर्थ जनतेची सेवा करणारा, जनतेच हित साधणारा असा असून असा कार्यकर्ता हेगडेवारांना अपेक्षित आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणूक देखील महत्त्वाची असून महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापन करायची आहे. यासाठी कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले.
भविष्यातील विधानसभा निवडणुक पाहता आपण आत्मपरीक्षण करणं देखील आवश्यक आहे. आपल्या बुथवर, तालुक्यात जे मिळवल ते विधानसभेसाठी पुरेसं आहे का याचा विचार आपण करायला हवा. त्यामुळे आगामी निवडणुकीत जिल्ह्यात एकसंघपणे काम केलं पाहिजे. आपण महायुती म्हणूनच लढणार आहोत त्यामुळे उमेदवार कोणीही असूदेत त्याला निवडून आणण आपल काम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. १८ तास ते काम करतात. त्यांच्याकडे प्रदिर्घ असं ज्ञान आहे. २०१४ ला जागतिक अर्थव्यवस्थेत देश ११ व्या स्थानी होता. आज देश पाचव्या क्रमांकावर आहे. ही सोप्पी गोष्ट नाही. भारताला हिणवायणे, निंदा करायचे त्यांना मोदींनी दाखवून दिलं. २०३० पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेत भारत तिसऱ्या क्रमांकावर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, काही दिवसानंतरच मी मराठवाड्यात जाणार आहे. भारतीय जनता पार्टीचे काही नेते हे संयमी असले तरीही आता आपल्याला आक्रमक व्हायला हवे. आमच्या नेत्यावरील टीका मी सहन करू शकत नाही. त्यामुळे यापुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलणाऱ्या उद्धव ठाकरे व संजय राऊत यांचा समाचार घेणार, असेही ते म्हणाले.
माझ्या विजया रवींद्र चव्हाण यांचा सिंहाचा वाटा : नारायण राणे
माझ्या विजयात रविंद्र चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे. दिवसरात्र काम करणारा हा माणूस आहे. उद्याच्या निवडणूकीत महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला निवडून आणायच आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात आपल्याला जिंकायच आहेचं मात्र, राज्यातही आपली सत्ता येणार आहे. त्यासाठी जोमाने कामाला सुरूवात करा असे आवाहन नारायण राणें यांनी केले. यावेळी लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार खासदार नारायण राणे तसेच अलीकडेच झालेल्या निवडणुकांमध्ये कोकणची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचाही नागरी सत्कार करण्यात आला. खासदार नारायण राणे यांना गणेश मूर्ती देऊन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

आज झालेल्या विस्तारित जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत भाजप तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनचा ठराव पारित करण्यात आला. तसेच खासदार नारायण राणे व आमदार निरंजन डावखरे तसेच अलीकडे झालेल्या निवडणुकांमधील यशाबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याही अभिनंदनाचा ठराव यावेळी घेण्यात आला.










