नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांना तहसीलदार पदी बढती
चिपळूण | वार्ताहर : सिधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथून चिपळुणात बदली झालेले तहसिलदार प्रवीण लोकरे नुकतेच रूजू झाले आहेत. तालुक्यात रूजू होताच त्यांनी महत्त्वाच्या बाबींची माहिती घेत पाहणी करण्यास सुरुवात केली. तर चिपळुणातील नायब तहसिलदार तानाजी शेजाळ यांना तहसिलदारपदी बढ़ती मिळाली आहे.
काही महिन्यापूर्वी येथील तत्कालीन तहसिलदार जयराज सूर्यवंशी यांची मुंबईत बदली झाली होती. त्यानंतर येथे नव्या तहसिलदारांची नियुक्ती झाली नव्हती. नायब तहसिलदार तानाजी शेजाळ गेल्या पाच सहा महिन्यापासून प्रभारी तहसिलदार म्हणून कामकाज पाहत होते. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच नागरिकांना विश्वासात घेत प्रभारी तहसिलदार शेजाळ यांनी काम करण्यावर भर दिला होता, त्यामुळे गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत तालुक्यात कायदा, सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. प्रशासकीय कामांचा वेळेत निपटारा करण्यात त्यांचा हातखंडा होता. चोरटी वाळू वाहतूक होणार नाही, याचीही त्यांनी खबरदारी घेतली होती. तहसिलदार. प्रविण लोकरे यांचीही वेंगुर्ला येथील कामगिरी दमदार अशी राहिलेली आहे. त्यामुळे चिपळुणात रूजू होताच, त्यांनी नायब तहसिलदार शेजाळ यांच्या साथीने कामांची पाहणी करण्यात सुरुवात केली. पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनावरही त्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. दरम्यान पदोन्नत्तीने तहसिलदारपदी बढती मिळालेले तानाजी शेजाळ यांची कारकीर्द तलाठी म्हणून काही वर्षापूर्वी महसूल खात्यात रुजू झाले. खेड तालुक्यात त्यांनी अनेक वर्ष काम केले. तलाठी, मंडळ अधिकारी आणि नायब तहसिलदार अशी पदोन्नत्तीने त्यांना बढती मिळत गेली. ग्रामस्थांची कामे वेळेत पूर्ण करायची, लोकांना सारखे हेलपाटे मारायला लावायचे नाहीत, यावर त्यांनी विशेष भर दिला होता, त्यांनी चिपळूण, खेड, तालुक्यात जनसपंर्क ठेवला होता. त्यांची पदोन्नतीने तहसिलदारपदी बढती मिळाल्याने तालुक्यातील विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
तानाजी शेजाळ नेहमीच दमदार राहिली आहे.