सलगच्या सुट्ट्यांमुळे कोकणाकडे जाणाऱ्या रेल्वेची प्रतीक्षा यादी २०० च्या पार

विशेष गाड्या सोडण्याची कोकण विकास समितीची मागणी
खेड(प्रतिनिधी) आगामी सण आणि लागोपाठ येणाऱ्या सुट्ट्यांमुळे मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या बहुतांश गाड्यांचे आरक्षण फुल झाले आहे. सलगच्या सुट्ट्यांमुळे १५ ते १९ ऑगस्टपर्यंत मुंबई आणि सावंतवाडीदरम्यान धावणाऱ्या सर्व गाड्यांना भली मोठी प्रतीक्षा यादी लागलेली आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई आणि सावंतवाडीदरम्यान स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधनानिमित्त विशेष गाड्या सोडण्याची मागणी कोकण विकास समितीकडून करण्यात आली आहे.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, १७-१८ ऑगस्ट (शनिवार, रविवार) आणि १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन हे सण आणि सुट्ट्या यंदाच्या वर्षी सलग सुट्ट्यांमुळे अनेकांनी आपल्या मूळ गावी तसेच पर्यटन स्थळी जाण्याचे नियोजन सुरू केले आहे. याचा परिणाम म्हणजे या दिवसात एसटी बसेस, रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल झाले आहे. नियमित गाड्यांना देखील प्रचंड गर्दी आहे. स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधनानिमित्त १५ ते १९ ऑगस्टपर्यंत मुंबई आणि सावंतवाडीदरम्यान धावणाऱ्या सर्व गाड्यांना भली मोठी प्रतीक्षा यादी लागलेली आहे.
ऑनलाइन रेल्वे वेबसाईट तिकीट बुकिंगसाठी तपासल्या असता १४ ऑगस्टच्या रात्रीपासूनच्या गाड्यांना ‘रिग्रेट’ संदेश निदर्शनास येत आहे. दरम्यान, २६ जानेवारीला लागून आलेल्या सुट्टीच्या वेळी जादा गाड्या न सोडल्यामुळे आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांनी एसी डब्यांतही गर्दी केलेली, तसेच प्रचंड गर्दीतून चाकरमान्यांना प्रवास करावा लागला होता. मात्र आता ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधनानिमित्त १५ ते १९ ऑगस्ट या कालावधीत रेल्वेने मुंबई ते सावंतवाडीदरम्यान विशेष जादा गाड्या सोडण्याची मागणी कोकण विकास समितीकडून करण्यात आली आहे.