मुख्यमंत्र्यांनी मागण्या मंजूर करूनही अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप
सावंतवाडी । प्रतिनिधी : नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्यातील नगरपरिषद तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला आज सावंतवाडी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा देत ‘काम बंद ‘ आंदोलन छेडले. यावेळी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या याबाबतच्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
राज्यातील नगरपरिषद व नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात गतवर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संघटनेच्या झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. मात्र, अद्यापही त्याची अंमलबजावणी न झाल्याने राज्यातील नगरपालिका व नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनात सावंतवाडी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी ही सहभागी होत आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील सर्व नगरपरिषदा नगरपंचायतीमधील प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव नगर विकास सचिव सामाजिक न्याय विभाग सचिव आणि आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्रशासन यांच्या उपस्थितीत घेतले होते. या सर्व निर्णयांची अंमलबजावणी गेली दोन वर्ष झालेली नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीने धरणे आंदोलने तसेच अन्य प्रकारे शासनाचे लक्ष वेधले, परंतु प्रश्न निकाली न लागल्याने अखेर राज्यातील सर्व नगरपरिषद नगरपालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
या पार्श्वभूमीवर सावंतवाडी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी ही या आंदोलनामध्ये सहभागी होत आजपासून काम बंद आंदोलनामध्ये सहभाग घेतला. समितीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग नाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी कार्याध्यक्ष देविदास आडारकर, सचिव दिनेश जाधव, दिनेश भोसले, जयवंत जाधव, शिवप्रसाद कुडपकर यांसह अन्य कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.












