पारंपारिक व आधुनिक शेती, शेती उद्योग मार्गदशन व विविध कार्यक्रमाचे आयोजन
मंडणगड : प्रतिनिधी – महसूल पंधरवडानिमित्त मंडणगड महसूल विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.5 ऑगस्ट 2024 रोजी लाटवण येथील सह्याद्री मोती शेती प्रकल्प येथे महसूल विभागच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास तहसीलदारांसह तालुक्यातील विविध विभागांचे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषी, पारंपारिक व आधुनिक शेती, शेतीवर आधारित विविध उद्योग या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन, बचत गट -उद्योजकता, सेंद्रिय शेती, खत निर्मिती, शेती पूरक उद्योग तसेच आधुनिक शेती उद्योग मोत्यांची शेती, रेशीम उद्योग, ड्रॅगन फूड शेती इत्यादी बाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमांमध्ये कृषी विभाग, पंचायत समिती कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग तसेच वित्तीय पुरवठा करणाऱ्या शासकीय बँक योजना याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील यशस्वी शेतकरी यांनी त्यांच्या यशोगाथाही सांगितल्या.
कार्यक्रमात तहसीलदार श्रीधर गालीपेल्ली, गटविकास अधिकारी विशाल जाधव, मंडळ अधिकारी निलेश गोडघासे, पशुसंवर्धन अधिकारी पूजा शिंदे, तालुका कृषी अधिकारी सोमनाथ आहेरकर, बँक ऑफ इंडियाचे अधिकारी श्री. निस्तुरे व विविध क्षेत्रातील प्रशिक्षक व शेतकरी, सर्व ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सर्व पोलीस पाटील, बीएलओ, अंगणवाडी सेविका व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.












