रत्नागिरी :
भर पावसात शहरातील माळनाका येथे पुलाजवळ पाण्याची पाईप लाईन फुटून लाखो लिटर पाणी मागील दोन दिवस वाहून जात आहे. नगर परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे.
पाऊस मोठ्याप्रमाणात पडत असल्याने शीळ व पानवल ही शहराला पाणी पुरवठा करणारी दोन्ही धरणे ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून शहर परिसरात पाणी पुरवठा चांगल्या पद्धतीने सुरु आहे. त्यामुळे नागरिकही पाणी टंचाईच्या समस्येतून सुटले आहेत. त्यामुळे जलवाहिन्या फुटून पाणी फुकट जात असले तरी त्याकडे न.प. प्रशासनही कानाडोळा करताना दिसत आहे.
शहरातील माळनाका येथे आयलॅण्डजवळच मागील दोन दिवसापासू पाईप लाई फुटली असून त्यातून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. सोमवार व मंगळवारीही दुपारी मोठ्याप्रमाणात पाणी बाहेर पडत होते. रस्त्याला झरे लागल्यागत पाणी बाहेर येत असल्याचे अनेक नागरिकांनी पाहिले. याबाबत न.प. प्रशासनाला माहिती देण्याचा प्रयत्नही काही नागरिकांनी केला. मात्र मंगळवारी न.प.चे आंदोलन असल्याने, नगर परिषदेकडून काही हालचाल झाल्याचे दिसून आले नाही.












