भाजपा चे नेते व माजी सरपंच उदय बोरकर यांचा आरोप
खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील बोरघर ग्रामपंचायतीत तत्कालीन ग्रामसेविकेने केलेल्या बोगस कर्मचारी नियुक्तीबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली. मात्र, ८ महिन्यांचा कालावधी उलटूनही पोलिसांनी कुठलीच कारवाई केलेली नाही. तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांच्या सहकाऱ्यासह राजकीय दबावातून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप बोरघरचे माजी सरपंच उदय बोरकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केला आहे.
ग्रामपंचायतीत शिपाई पदासाठी परीक्षा घेऊन व वेबसाईटसह दैनिकात जाहिरात देऊन शासन निर्णय व शासकीय नियमानुसार पात्र उमेदवाराची नेमणूक केली जाते. मात्र, तत्कालीन ग्रामसेविका शिपाई, पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी नियुक्तीबाबत बनाव पूर्वनियोजित कट व नियोजनबद्ध आखणी करून बोगस पदभरती केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बोगस कर्मचारी प्रकरणी मासिक सभेत संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार पोलीस स्थानकात
रितसर तक्रारही दाखल करण्यात आली आहे. येथील पोलिसांनी कारवाई न केल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे आदेश व मार्गदर्शक निवाडे यांच्या प्रती पोलीस अधीक्षकांकडे ग्रामपंचायतीने सादर केलेले असतानाही अद्यापही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करणार असल्याचे माजी सरपंच बोरकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.










