खेड उपविभागात महसूल सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ; उल्लेखनीय कामगिरीबद्दल अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
खेड (जि. रत्नागिरी) –
खेड उपविभागात महसूल सप्ताह २०२५ चा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. श्री. कालकाई सभागृह, भरणे येथे हा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी मा. श्रीम. वैशाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
या कार्यक्रमात महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना थेट प्रमाणपत्रे व सेवा वितरण करण्यात आले. यामध्ये ई-रेशन कार्ड, उत्पन्न दाखले, जिवंत ७/१२ उतारे, तसेच फेरफार दाखले यांचा समावेश होता. यामुळे नागरिकांना विविध सेवा सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने प्राप्त झाल्याचा अनुभव आला.
कार्यक्रमाच्या विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे सन २०२४-२५ या वर्षात उपविभागात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा सन्मान. त्यांच्या कार्याची प्रशंसा करत मा. पाटील यांनी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले.
त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “महसूल विभागाच्या कार्याची व्याप्ती खूप मोठी आहे. नागरिकांना प्रत्यक्ष सुलभ सेवा देणे हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. ई-सेवांच्या माध्यमातून ही प्रक्रिया आणखी पारदर्शक व जलद झाली आहे.”
महसूल सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण उपविभागात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, नागरिकांपर्यंत महसूल विभागाच्या सेवा पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमास महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, मंडल अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










