खेडमध्ये डास प्रतिबंधक फवारणी सुरूच

खेड(प्रतिनिधी) शहरात डेंग्यू साथीचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता नगरप्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे. शहरात डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या ठिकाणांसह ‘डोअर टू डोअर’ डासप्रतिबंधात्मक फवारणी मोहीम अधिक गतिमान करण्यात आली आहे.
मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्यामार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी नागेश बोंडले व नगर परिषदेचे कर्मचारी डेंग्यू साथीवर विशेष लक्ष ठेवून आहेत. डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणी जंतूनाशक फवारणी करून संबंधित बांधकाम व्यावसायिकांना पावसाचे पाणी साचणारे डबके बुजवण्याच्या सूचना केल्या जात आहेत.
मटण-मच्छी मार्केट परिसरासह साठे मोहल्ला कोष्टी आळी, बाजारपेठ, वाणीपेठ, पोत्रिक मोहल्ला, शिवतररोड, पोलीस वसाहत याठिकाणी डास फवारणीची मोहीम राबवण्यात आली. आपआपल्या नागरिकांनीही घरालगत साचणाऱ्या पाण्यामुळे डासांची पैदास होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याबाबतही प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे.