महसूल पंधरवडानिमित्त महसूल विभागाच्या वतीने आमदारांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम –
मंडणगड | प्रतिनिधी :महसूल पंधरवडानिमित्त महसूल विभागाच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्या, यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीत झालेले नुकसान, तालुक्यात सुरु असलेले राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांसाठी निर्माण झालेल्या समस्या याबाबत सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला आमदार योगेश कदम उपस्थित होते. यावेळी आयोजित आढावा सभेत आमदार योगेश कदम यांनी नागरिकांच्या समस्या पाहून विविध शासकीय विभागांना चांगलेच धारेवर धरले.
या बैठकीत राष्ट्रिय महामार्गाच्या लोणंद – आंबडवे मार्गाच्या सुरु असलेल्या कामांमुळे तालुक्यात निर्माण झालेल्या विविध समस्या यावर खूप वेळ चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या महामार्गात जाणाऱ्या जमीन अधिग्रहणाचा प्रश्न, महामार्ग प्राधिकरणाचे तुळशी घाट व अन्य ठिकाणी चुकीच्या पद्धतीने होत असलेले काम व सुरु असलेल्या कामामुळे रस्त्याची झालेली दुरवस्था याबाबत नागरिकांनी समस्या मांडल्या. नागरिकांच्या समस्या पाहून आमदार योगेश कदम यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. यानंतर कृषी विभाग, महावितरण, बीएसएनएल या विभागांचा आढावा आमदारांनी घेतला. कार्यक्रमाच्या औचित्याने महसूल विभागातील विविध शासकीय दाखल्यांचे वितरण करण्यात आले व पावसात नुकसानग्रस्त नागरिकांना महसूल विभागाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे कीटचे वाटप करण्यात आले.
यावेळी तालुक्यातील पालघर येथे जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत भारजा नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या इसमास सुरक्षितपणे बाहेर काढून वाचवणाऱ्या बचाव पथकातील व्यक्तींचा सत्कार आमदार योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये बचाव पथकातील पालघर येथील मुश्ताक कोंडेकर, यशवंत म्हामुणकर, वासिम चिखलकर, नासीर मुल्ला, नाजीज मुल्ला, करीम मुल्ला, सुशील जागुष्ठे, बद्रुद्दीन चिपळूणकर या सत्कारमुर्तींचा समावेश होता. कार्यक्रमात तहसीलदार श्रीधर गालीपेल्ली यांनी या पावसाळ्यात आपत्कालीन स्थितीत विविध समस्या मार्गी लावून केलेल्या कामगिरीबाबत त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात प्रांताधिकारी अजित थेारबोले, तहसीलदार श्रीधर गालीपेल्ली, गटविकास अधिकारी विशाल जाधव, राष्ट्रीय महामार्गाचे शाखाअभियंता अभिजित झेंडे, महसूल नायब तहसीलदार अमरसिंग जाधव, संजय गुरव, माजी पंचायत समिती सभापती आदेश केणे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष मुझ्झफर मुकादम, राकेश साळुंखे व तालुक्यातील शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.











