डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आंबडवे येथे महसूल पंधरवडा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

मंडणगड /प्रतिनिधी : येथील विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आंबडवे व तहसील कार्यालय मंडणगड यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल पंधरवडा दिनानिमित्त नुकतेच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून मंडणगडचे नायब तहसीलदार अमरसिह जाधव हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी आयोजित कार्यक्रमात युवा संवाद अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मतदार जागृती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व परीक्षेचे स्वरूप व संधी तसेच त्यासाठी असणारा अभ्यासक्रम याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले. त्यानंतर महसूल विभागातील कर्मचारी मनोहर पवार , अमोल पाटील, नयन बोबडे, दिपाली केणी यांनी विविध प्रकारचे शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले, व केंद्र व राज्यशासनाद्वारे देण्यात येणार्‍या विविध शिष्यवृती तसेच शासकीय योजना यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना, अशा विविध योजना विषयी त्यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले.

 

 

यावेळी महाविद्यालयाचे सहा. प्रा. मंगेश ठसाळे, राजेंद्र राऊत, सायली घाडगे व ग्रंथपाल डॉ. दिगंबर हेमके तसेच अंबडवे येथील सरपंच सौ. दिपिका जाखल व ग्रामस्थ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहा. प्रा. अमोल राजेशिर्के यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून आयोजित कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर आभारप्रदर्शन अंश तांबे याने केले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.