मद्यपीने शिवीगाळ केल्याचा राग आल्याने 18 वर्षीय तरुणाने त्याच्या डोक्यात घातला चिरा

उपचारादरम्यान जखमी प्रौढाचा मूत्यू; तरुणावर गुन्हा दाखल 

रत्नागिरी | प्रतिनिधी : काही दिवसांपूर्वी जेलरोड येथील सर्कलजवळ तरुणाच्या डोक्यात चिरा घातल्याने गंभिर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चिरा घालणार्‍या संशयिताविरोधात आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेदांग चंद्रकांत आखाडे (18, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी 19 एप्रिल रोजी पहाटे 4 वा.  घडली होती. विल्सन सॅम्युअल वाघचौरे ( 35, रा. गवळीवाडा, रत्नागिरी)या मद्यपीने दारुच्या नशेत बुधवारी पहाटे वेदांगला शिवीगाळ केली होती. या रागातून वेदांगने त्याच्या डोक्यावर पायावर चिरा घालून गंभीर जखमी केले होते. गंभीर जखमी अवस्थेत विल्सनला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणी विल्सन च्या भावाने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरुन पोलिस भादवी कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीही सुनावली होती. मात्र उपचारांदरम्यान विल्सनचा जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यूस कारणीभूत झाल्या प्रकरणी पोलिसांनी संशयित वेदांग आखाडे याच्या विरुद्ध भादंवी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला.