लाभार्थ्यांवर अन्याय, कृषि विभागाचा अजब कारभार- शौकत मुकादम
चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने कृषि यांत्रिकीकरण या योजनेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना शेती नांगरण्यासाठी पॉवर टिलर दिले जातात व याकरिता महाराष्ट्रातील तालुका कृषि अधिकारी मार्फत ऑनलाईन अर्ज मागविले जातात व आलेल्या अर्जाची लॉटरी मंत्रालय कृषि विभागामार्फत काढली जाते. ज्या शेतकऱ्यांची नावे लॉटरीमध्ये येतील त्यांना पॉवर टिलर खरेदी केल्यावर ५० टक्के अनुदान दिले जाते. पाऊस संपायला आला तरी शासनाने अद्याप लॉटरी फोडलेली नाही. हा संबंधित शेतकरी लाभार्थ्यांच्यावर अन्याय आहे.
महाराष्ट्र शासनाने अनेक योजना आखल्या आहेत. शेतकऱ्यांच्या संबंधित असलेली कृषि यांत्रिकीकरण योजनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्यावर अन्याय झाला आहे. लॉटरी फोडण्यासाठी अजुन किती दिवस थांबावे लागणार. मार्चमध्ये पावसाळयापुर्वी सदरची लॉटरी फोडणे आवश्यक होते. तरी ताबडतोब सदरची लॉटरी फोडुन संबंधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंढे यांना चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम कळविले आहे. चिपळूण तालुका कृषि अधिकारी श्री. मेहेत्रे यांची मुकादम यांनी भेट घेवुन ताबडतोब शासनाकडे संपर्क साधुन १५ दिवसाच्या आत लॉटरी फोडण्यात यावी असे शासनाला कळवावे नाही तर संबंधित लाभार्थ्यांना घेवुन आम्ही आपल्या कार्यालयात बसु असे सांगितले आहे.











