मंडणगड : प्रतिनिधी : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिडे आदिवासी वाडी या शाळेमध्ये डिव्हग्लोबल एज्युकेअर फौउंडेशन यांच्यावतीने शाळेसाठी वॉटर फिल्टर देण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही आज अशी काही गावे आपल्याला पाहायला मिळतात, की जिथे अजून जगण्यासाठी प्राथमिक सुविधा सुद्धा पोचलेल्या नाहीत. जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. ज्या गावात जायला अजून नीट रस्ता सुद्धा नाही किंवा आधुनिक सेवा सुविधेनुसार या गावचे लोकेशन गुगल वर सुद्धा मिळत नाही ,अशा ह्या आदिवासी गावात एक अख्खी वस्ती आहे आणि त्यांच्या मुलांसाठी एक छोटीशी शाळा सुद्धा आहे. ही एक आशादायी बाब म्हणता येईल.
निसर्गाच्या सानिध्यात राहणारे आणि नैसर्गिकरित्या जगणारी ही साधी माणसं. अगदी नदीकिनारी राहणारी. बाजूला वाहणारी भारजा नदी. 24 तास पाणी घेऊन वाहणारी नदी असली तरी आदिवासी वाडीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. आजही त्यांना नदीच्या बाजूला खड्डाखोदून त्यातून पाणी भरावे लागते.
ही बाब लक्षात घेऊन
डिव्हग्लोबल एज्युकेशन फौउंडेशनच्या संचालक मंडळाने पुढे सरसावत ,या विद्यार्थ्यांना स्वच्छ ,निरामय व निर्धोक पाणी मिळावे. यासाठी शाळेला वॉटर फिल्टर भेट म्हणून दिले आहे.
आपल्यालाही आता वॉटर फिल्टर मधून पाणी पिता येणार , हा मुलांच्या डोळ्यांतून ओसंडणारा आनंद पाहून, कार्यकर्त्यांचे मन हेलावून गेल. त्यावेळच्या मुलांच्या डोळ्यातील उत्सुकता , उत्कट भाव हा केवळ शब्दातीत होता.
या कार्यक्रमाला कै.सौ. सावित्रीबाई भागोजी निमदे कुणबी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंडणगडचे चेअरमन श्री. दिनेश सापटे उपस्थित होते. त्याचबरोबर लालबहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव चे माजी मुख्याध्यापक श्री. भरत पाटील ,उद्योजक पांडुरंग बांद्रे ,सौ अक्षता बैकर तसेच तिडे शाळेचे मुख्याध्यापक श्री. निलेश लोखंडे, शिक्षिका सौ.वर्षा जाधव तसेच डिव्हग्लोबल एज्युकेअर फौंऊंडेशनचे सभासद मॅलिसा बांद्रे,सिध्देश जगदाळे आणि विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप संस्थेमार्फत करण्यात आले. भारत मातेची मूर्ती ही देण्यात आली.
‘ देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे.’ हा गुण समाजाला घेण्यासारखा आहे.
याप्रसंगी डिव्हग्लोबल एज्युकेअर फौंऊंडेशनच्या संस्थापिका कुमारी सानिका बांद्रे यांनी फाउंडेशनचे ध्येय आपल्या प्रस्तावनेतून स्पष्ट केले. तसेच डिव्हग्लोबल एज्युकेअर फौंऊंडेशनचे संस्थापक कुमार शुभम बैकर यांनी भारत मातेच्या मूर्ती विषयी आपली संकल्पना व संस्कृतीचे दर्शन घडवले. श्री .भारत पाटील सरांनी फाैंडेशन चे कार्य समजून घेऊन यापुढे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पतसंस्थेचे चेअरमन श्री.दिनेश सापटे यांनी व्यवसाय व त्यासाठी लागणारे कर्ज विषयक पालकांना मार्गदर्शन केले.
शेवटी आभार प्रदर्शनाने या उत्कृष्ट अशा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.











