तळवली l वार्ताहर : पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता. गुहागर येथील ज्युनियर काॅलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या हस्तकला कार्यशाळेस विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
इयत्ता अकरावी व इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यातील सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी,त्यांच्यातील कला कौशल्यांचा शोध घेण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. इयत्ता अकरावी व बारावीत शिकत असलेल्या एकुण 65 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत प्रत्यक्ष सहभाग घेतला.
या हस्तकला कार्यशाळेत वस्तू बनविण्यासाठी लागणारे साहित्य विद्यार्थ्यांनी स्वतःच आणून, त्यांना ठरवून दिलेल्या वेळेत आपल्या हस्तकौशल्याचा वापर करून विविध कला कुसरीच्या एकापेक्षा एक अशा सुंदर वस्तू या विद्यार्थ्यांनी तयार केल्या.विशेष म्हणजे कमीतकमी खर्चात, टाकाऊपासून टिकाऊ सुंदर व आकर्षक वस्तू तयार केल्या.अशा विद्यार्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हस्तकला कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना ज्युनियर काॅलेज विभाग प्रमुख प्रा.अमोल जड्याळ सर, प्रा. सौ.आयरे मॅडम, प्रा.सौ.कांबळे मॅडम, प्रा. सौ. जड्याळ मॅडम, प्रा.कु.सावंत मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याचे संपूर्ण नियोजन व आयोजन उत्कृष्ट पद्धतीने करून कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी या प्राध्यापक वृंद यांनी योगदान दिले.
हस्तकला कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांची स्पर्धा घेऊन त्यात दोन्ही गटांना प्रथम तीन क्रमांक व दोन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. या मध्ये इयत्ता अकरावी कला गटात प्रथम क्रमांक – कु. अक्षय सोलकर,द्वितीय क्रमांक कु.मनस्वी जोगळे ,तृतीय क्रमांक कु.शर्वरी शितप तर उत्तेजनार्थ कु.राज भुवड व कु.नैना पवार यांनी पारितोषिके पटकावली. तसेच इयत्ता बारावीच्या गटात प्रथम क्रमांक कु.यश भातडे,द्वितीय क्रमांक कु.प्रियदा भागडे,तृतीय क्रमांक कु.मुक्ता सावंत तर उत्तेजनार्थ कु.रिया पवार व कु.देवेंद्र जाधव यांनी पटकावले.या विद्यार्थ्यांना आकर्षक ट्राॅफी,प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली. कला शिक्षक श्री.श्रीनाथ कुळे सर यांनी या स्पर्धेचे परीक्षण करून योग्य त्या विद्यार्थ्यांची निवड केली.यावेळी विद्यार्थ्यांच्या कला कौशल्यांचे कौतुक करून मोलाचे मार्गदर्शनही त्यांनी केले.मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांनी या कार्यशाळेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना या कलेचा उपयोग आपल्या भविष्यात स्वावलंबी होण्यासाठी नक्कीच होईल असे सांगून त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ.आयरे मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रा. जड्याळ सर यांनी केले.











