राजापुरातील स्वयंघोषीत प्रकल्प विरोधी पुढाऱ्याच्या दबावाखाली राजापुरातील प्रकल्पांबाबत निर्णय घेणार का?
पर्यावरण पुरक व्यवसाय आणणार सांगणाऱ्या या पुढाऱ्याने किती प्रकल्प आणले व किती जणांना रोजगार दिले?
राजापुरातील प्रकल्पांबाबतची उद्योगमंत्री व त्या पुढाऱ्याची भूमिका राजकिय स्वार्थासाठी असल्याची राजापुरात चर्चा
राजापूर (प्रतिनिधी): तालुक्यात नाणार व सागवे हमदरा घोडेपईवाडी प्रस्तवित असलेल्या बॉक्साईड उत्खनन प्रकल्पाच्या जनसुनावणीला अनिश्चत काळासाठी आपण स्थगिती देत असल्याची घोषणा जिल्हयाचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. मात्र अशा प्रकारची घोषणा करताना त्यांना आपल्या उद्योगमंत्री पदाचा विसर पडला की काय? असा सवाल राजापूर तालुका वासीयांतुन उपस्थित केला जात आहे. राजापूर तालुक्यात कोणताही प्रकल्प आला की त्याला विरोध करणारी काही ठराविक मंडळी आणि काही स्वयंघोषीत पुढारी विरोधासाठी पुढे येतात. पण या विरोधापाठीमागे नक्की काय परिस्थिती आहे, एखाद्या प्रकल्पाबाबत स्थानिक पातळीवरील जनतेचे काय मत आहे हे जाणून न घेता केवळ कुणाला तरी खूष करण्यासाठी उद्योगंमंत्रीच जर अशा घोषणा करून प्रकल्पांचा गळा घोटून स्थानिकांच्या रोजगारावर गदा आणत असतील तर मग हे उद्योगमंत्री उद्योग आणण्याठी की उद्योगांचा गळा घोटण्यासाठी? असा संतप्त सवाल राजापूरवासीयांतुन उपस्थित केला जात आहे.
लगतच्याच सिंधुदुर्ग जिह्यात काही भागात गेली कित्येक वर्षे बॉक्साईड व आयर्न (लोहखनिज)प्रकल्प सुरू असताना यातुन हजोरो लोकांना रोजागारची संधी मिळून त्या गावांचा विकास झालेला असताना यातलाच एक प्रकल्प राजापूर तालुक्यात येणार असेल आणि त्यातुन त्या भागाचा विकास होणार असेल तर राज्याचे उद्योगमंत्री म्हणून याबाबत जनतेला माहिती देऊन समाधान करण्याचे सोडून एका स्वयंघोषीत चमको पुढाऱ्याच्या दबावाला बळी पडून उद्योगमंत्री प्रकल्प विरोधी भूमिका का घेत आहेत? असा जनतेचा सवाल आहे.
यापुर्वीही जैतापूर अणुऊर्जा, रिफायनरी, आयलॉग पोर्ट यांसारख्या प्रकल्पाला विरोध करून चमकोगिरी करू पहाणाऱ्या या स्वयंघोषीत पुढाऱ्याने आंम्ही तालुक्यात पर्यावरण पुरक उद्योग आणू व इथल्या महिलांना, बेजरोजगार तरूणांना रोजगार देऊ अशा वल्गना केल्या होत्या. त्या किती पुर्ण केल्या, त्यातील किती उद्योग आणले, किती जणांना रोजगार दिला हे जाहिर करावे किंवा त्याला कुशीत घेऊन बसणाऱ्या उद्योगमंत्र्यांनी हे त्या पुढाऱ्याला विचारावे आणि जनतेला सांगावे अशी मागणी जनतेतुन होत आहे. या एकूणच प्रकल्प विरोधकांच्या दबावाला बळी पडून उद्योगमंत्र्यांनी राजापुरात होणाऱ्या प्रकल्पांचा गळा घोटण्याचे काम थांबवावे अशीही मागणी होत आहे.
तालुक्यात सन २००९ पासून प्रस्तावीत असलेल्या जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाचे भवितव्य अद्याप अधांतरीच आहे, त्यानंतर प्रारंभी नाणार येथे प्रस्तावित असलेल्या व त्यानंतर बारसू परिसरात प्रस्तावित करण्यात आलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबतही अधांतरीच भूमिका आहे. या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधापेक्षा त्याच्या समर्थकांची संख्या जास्त असूनही त्याबाबत उद्योगमंत्र्यांनी आजही गांभीर्याने विचार केलेला नाही, या ठिकाणी करण्यात आलेल्या माती परिक्षणाचा अहवालही अद्याप जाहिर करण्यात आलेला नाही. या प्रकल्पाबाबत ठोस भूमिका घेणे आवश्यक असतानाही उद्योगमंत्री उदय सामंत हे जनतेला विश्वासात घेऊन पुढे जाऊ असे नेहमीचे आणि सोयीचे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे हा प्रकल्पही आता लटकल्यात जमा आहे. तीच अवस्था तालुक्यातील आंबोळगड येथील प्रस्तावित आय लॉग जेटीच्या प्रकल्पालाची आहे. या प्रकल्पाच्या बाबतीतही राज्य शासन व उद्योगमंत्र्यांची बघ्याच्या भूमिका आहे. आता तीच अवस्था नाणार व सागवेतील बॉक्साईड उत्खनन प्रकल्पांबाबत आहे.
या साऱ्या प्रकल्पांना विरोध करणारी तीच तीच मंडळी व त्याच एनजीओ आहे. हा स्वयंघोषीत पुढारी तर आपणच जणू राजापूरातील जनतेचा तारणहार असल्याचा आव आणून जणू मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री माझ्या खिशात आहेत असे जनतेला सांगून अशा प्रकल्पांना विरोध करून त्यांना वाकवून आपल्या मनासारखे करून घेत आहे. पण हा पुढारी कोणाची सुपारी घेऊन काम करतोय याचा शोध शासनाने घेणे आवश्यक असतानाही तसे होताना दिसत नाही, उलट उद्योगमंत्री त्या पुढाऱ्याला प्रशासनाचे संरक्षण कवच देत आहेत. त्यामुळे या पुढाऱ्याचे आणखीनच फावत आहे. शासन, प्रशासनाकडून एवढी लाचारी का केली जात आहे असा जनतेचा सवाल आहे.
तालुक्यात येणाऱ्या या प्रकल्पांबाबत जनसामान्याना समजावण्याचे त्याचे फायदे तोटे सांगण्याचे काम करण्याऐवजी बाहेरुन आलेल्या एनजीओंच्या आणि या पुढाऱ्याच्या विरोधाची री ओढण्याचेच काम केले. प्रत्येक प्रकल्पाच्या माध्यमातुन केवळ राजकिय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जात असून यामुळे कोकणचा विकास रोखला गेला अशी भावना आता जोर धरु लागली आहे .
रत्नागिरी जिल्हयाच्या लगतच असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हयात रेड्डी, कासार्डे या ठिकाणी मायनिंग प्रकल्प सुरू आहेत. काही तर गेली चाळीस ते पन्नास वर्षं सुरळीतपणे सुरू आहेत. यातुन स्थानिकांना रोजगार मिळाला आहे, त्या भागाचा विकास झाला आहे. रत्नागिरी जिल्हयात मंडणगड परिसरात घुडेघर परिसरात गेली आठ ते दहा वर्ष मायनिंगचा प्रकल्प सुरळीतपणे सुरू आहे. मग राजापुरात का नको, याचे नेमके कारण काय? याबाबत उद्योगमंत्र्यांनी जनेतला सांगितले पाहिजे. शासनाचे प्रतिनिधी राज्याचे उद्योगमंत्री म्हणून स्पष्ट आणि रोखठोक भूमिका जनतेसोमोर मांडणे आवश्यक आहे. कुणाच्या तरी दबावाला बळी पडून भविष्यातील निवडणूकीचे आराखडे बांधून निर्णय घेऊ नयेत अशी राजापूरवासीयांची अपेक्षा आहे.
रत्नागिरीचा विकास आणि राजापूर भकास हा तर कार्यक्रम नाही ना?
रत्नागिरीत फिनोलेक्स, जिंदाल यांसारख्या प्रकल्पामुळे रत्नागिरीच्या विकासाला गती मिळाली आहे हे सर्वच जण मान्य करतात. तर रत्नागिरीत वैद्यिकय महाविद्यालयासह अन्य होणाऱ्या विकासाचेही जनतेतुन स्वागत आहे. मग राजापूरचा विकास का नको? राजापूरात प्रकल्प का नकोत? राजापूरातील बेरोजगारांना काम का नको? राजापूरचा सर्वांगिण विकास का नको? हे जिल्हयाचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री म्हणून उदय सामंत यांनी राजापूरच्या जनतेला सांगावे अशी जनतेची मागणी आहे.
एमआडीसीची घोषणा पण त्यातील जमिनी कुणाच्या तपासा
राज्याचे उद्योगमंत्री म्हणून उदय सामंत यांनी राजापूर तालुक्यात प्रारंभी बारसू परिसरातील काही भाग एमआडीसी म्हणून जाहिर केला आहे. त्यानंतर वाडीखुर्द गावातील काही जागा ही एमआडीसी साठी संपादीत करण्यात आली आहे. या ठिकाणी एमआयडीसीच्या माध्यमातुन कारखाने येऊन त्यातुन रोजगार येणार असतील तर त्याचे राजापूवासीय स्वागतच करतील. पण या परिसरात एमआडीसी साठी जागा संपादन होण्यापुर्वी वर्ष ते सहा महिन्यात जमिनींचे मोठया प्रमाणावर खरेदी विक्रीचे व्यवहार झाले. सामान्य शेतकऱ्यांची जमिन कवडीमोल भावाने बडया उद्योजक व धनदांडग्यांनी घेतली. त्यामुळे आता एमआडीसी झाली तरी इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना काहीच मिळणार नाही. मग उद्योगमंत्री गेल्या वर्षभरात झालेले या भागातील खरेदी विक्रीचे व्यवहार रद्द करून स्थानिक शेतकऱ्यांना न्याय देण्याचे धाडस दाखवणार काय? या पाठीमागे कोण आहे ? या परिसरात भविष्यात एमआडीसी येणार हे या जमिन खरेदी करणाऱ्या बडया उद्योजक व धनदांडग्यांना कसे समजते याचे उत्तर देणार का? असा राजापूरवासीयांचा सवाल आहे.
काय आहे नाणार येथील बॉक्साइड प्रकल्प
“नाणार बॉक्साईट ब्लॉक” हा गाव नाणार, तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी येथे असून, मेसर्स सोसियादादे दी फोमेंतो इंडस्ट्रीयल प्रा.लि. मडगाव, गोवा यांना महाराष्ट्र शासनाकडून खनिज लिलाव नियम, 2015 अंतर्गत ई लिलावातून खाण लीज मंजूर करण्यासाठी घोषित करण्यात आलेला आहे. या प्रकल्पासाठी गुरूवार दि.29 ऑगस्ट 2024 रोजी जनसुनावणी शासनातर्फे घेण्यात येणार होती. ती आता स्थगित करण्यात आलेली आहे.
या प्रकल्पाचे एकूण क्षेत्र 144.95 हेक्टर एवढेच असून त्यात कातळ जमिन ज्यात काही पिक येत नाही अश्या जमिनीचा ज्यास्त भाग दिसतो. या खडकाळ जमिनीतील बॉक्साईट काढतांना ही जमीन उकरून त्यात उरलेल्या मातीने पुनर्भरण होऊन झाडे लावण्या योग्य असते. बॉक्साईट काढण्यासाठी जास्तीत ज्यास्त 10 ते 12 मीटर पर्यंतच खाणकाम केले जाते व बॉक्साईट काढल्यानंतर उरलेल्या मातीने पुनर्भरण केले जाते.
या प्रकल्पातील जमीन झाडे लावण्यासाठी योग्य होईल. तसेच रोजगार निर्मिती, इतर कामधंदे वाढतील, भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांचा विकास होईल. तसेच, या खाण उपक्रमाद्वारे, देश्यासाठी व राज्यासाठी कर आणि रॉयल्टी इत्यादीं स्वरुपात मिळेल. या प्रकल्पामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता नसताना या प्रकल्पाबाबत स्थानिक जनतेत विश्वास निर्माण करण्याऐवजी काही तथाकथीत पुढाऱ्यांची मर्जी राखण्यासाठी व आगामी विधानसभा निवडणूकीत राजकिय फायद्यासाठी तर हा निर्णय पालकमंत्र्यांनी घेतला तर नाही ना अशी चर्चा होत आहे.











