कंत्राटी शिक्षकांच्या आंदोलनाला बहुजन विकास आघाडी, बळीराज सेना यांचा सक्रिय पाठिंबा

 
 
सर्व ताकतीनिशी आंदोलनात उतरणार : सुरेश भायजे,अध्यक्ष बहुजन विकास आघाडी

रत्नागिरी । प्रतिनिधी : कोरोना प्रादुर्भाव नंतरच्या अगदी पडत्या काळात शिक्षक भरती नसतानाही मुलांची शिक्षकां अभावी होणार गैरसोय दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेने बेरोजगार तरुणांना हाक दिली आणि त्यांनी अवघ्या नऊ हजार रुपये प्रतिमहा मानधनावर अकरा महीने शिक्षक म्हणून सेवा बजावली. मात्र या शिक्षकांना वाऱ्यावर सोडून देत जिल्हा परिषदेने या कंत्राटी शिक्षकांना कमी करून त्याजागी नवीन शिक्षकांची भरती केली. जिल्हा प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरुद्ध या कंत्राटी शिक्षकानी १५ ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात बहुजन विकास आघाडी, बळीराज सेना व जिल्ह्यातील विविध कुणबी संघटना सक्रिय सहभागी होतील असे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश भायजे यांनी स्पष्ट केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने सुशिक्षित , उच्चशिक्षित बेरोजगार मुलं असतानाही परजिल्ह्यातील मुलांची भ्रष्ट मार्गाने रत्नागिरी जिल्ह्यात नोकर भरती केली जात असल्याने इथली स्थानिक मूल देशोधडीला लागली आहेत. नोकरीसाठी पुणे, मुंबई सारख्या शहराकडे वळत आहेत. त्यामुळे गावच्या गाव विस्थापित होऊन ओस पडत चालली आहेत. आज रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक, ग्रामसेवक ,आरोग्य कर्मचारी, तलाठी , कृषी कर्मचारी ,वीज कर्मचारी, एसटी कर्मचारी , जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महावितरण , शासकीय हॉस्पिटल , पाटबंधारे कार्यालय, सार्वजनिक बांधकाम कार्यालय, एसटी कार्यालय आदींचा सर्वे केला असता सुमारे साठ हजार अधिकारी व कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी या जिल्ह्यात शासकीय नोकरी करत आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक फक्त ३१४० अधिकारी व नोकरदार चा समावेश आहे. त्यातील ५०% हे कंत्राटी नोकरदर आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिकांच्या वाटेला फक्त दीड टक्का एवढ्याच शासकीय नोकऱ्या वाट्याला आलेल्या आहेत. बाकी सर्व नोकऱ्या भ्रष्ट मार्गाने पर जिल्ह्यातील, परप्रांतातील लोकांनी गिळंकृत केल्या आहेत. त्यामुळे रत्नागिरीतील स्थानिकांच्या काही पिढ्या बरबाद होऊन लोक देशोधडीला लागले आहेत.गावच्या – गाव सोडून लोक शहराकडे वळले आहेत. असे आम्ही केलेल्या जिल्ह्यातील नोकरदारांच्या सर्व्हे वरून दिसून येत आहे असे श्री भायजे यांनी सांगितले.

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावे दुर्गम व डोंगरी असूनही व त्याना स्वतंत्र वेगळे निकष असूनही त्याची पायमल्ली केली जात असल्याचे स्पष्ट होते. कोकणासाठी आता नोकरीचे स्वतंत्र बोर्ड व मंडळ स्थापन करण्याची गरज असल्याचे वरील आकडेवारीवरून दिसून येते.नाहीतर आणखी काही वर्षांनी परप्रांतीयांच्या आक्रमणामुळे स्थानिक लोक हद्दपार होऊन कोकण बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही.

म्हणून या प्राथमिक, कंत्राटी शिक्षकांच्या आंदोलनात जिल्ह्यातील सर्वच सरपंच संघटना , विविध सामाजिक संघटना , विशेषता जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांनी, भविष्याचा वेध घेऊन विद्यार्थ्यांनी संघटनानी व विविध कर्मचारी संघटनांनी या आंदोलनात सक्रिय सहभागी होणे अत्यावश्यक आहे.
सन २००९ पर्यंत रत्नागिरी शिक्षक भरती पूर्णपणे थांबलेली होती. त्यामुळे त्यावेळचे डीएड, बीएड व पदवीधर मुल नोकरी अभावी विस्थापित होऊन देशोधडीला लागली. पदरचे लाखो रुपये खर्च करून, प्रसंगी कर्ज काढून ज्या पालकांनी आपल्या मुलांना शिकवलं त्यांची अवस्था तर जगून मेल्यासारखीच आहे. त्यातील आजही काही तरुण चिरेखाण, जंगलतोड, मंडप, रंगकाम आदी काबाड कष्टाची, मजुरीची कामं करतात. एक तरुण पिढी बरबाद होते न होते तोच आता एक तपा नंतर २०२४ या वर्षी ‘पवित्र पोर्टल’ शिक्षक भरती परीक्षेतून सुमारे दीड हजार शिक्षक भरले गेले. मात्र त्यात एक टक्काही रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक मुल नाहीत .पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत भ्रष्ट मार्गाने परजिल्ह्यातील हजारो मुल रत्नागिरीत शिक्षक म्हणून दाखल झाली आहेत. त्यामुळे गुणवत्ता असूनही भ्रष्टाचाराच्या आगडोंबात स्थानिक डीएड ,बीएड, पदवीधर मुलांची दुसरी पिढी ही जळून खाक झाली.. बरबाद झाली… म्हणूनही कंत्राटी काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय हक्कासाठी आंदोलन करावे लागत आहे.

अन्याय करणाऱ्या पेक्षा जो अन्याय सहन करतो तो दोषी म्हणून आयुष्यभर कुढत कुढत मरण्यापेक्षा सत्याग्रही मार्गाने आंदोलनात सहभागी होऊन रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील तिरंग्याखाली मरायची तयारी ठेवा असं आवाहन सुरेश भायजे यांनी जिल्हावासिय स्थानिकांना केले आहे.