बॉक्साईट प्रकल्पाबाबत जनतेला परिपुर्ण माहिती द्यावी

मग जनसुनावणी घ्यावी माजी आमदार- ॲड. सौ. हुस्नबानू खलिफे

राजापूर | प्रतिनिधी : राजापूर तालुक्यात नाणार व सागवे हमदरा घोडेपईवाडी प्रस्तवित असलेल्या बॉक्साईड उत्खनन प्रकल्पांबाबत स्थानिक जनता व शेतकऱ्यांना हा प्रकल्प म्हणजे नेमके काय आहे याबाबतच्या वस्तुस्थितीची माहिती होणे आवश्यक असून त्यानंतरच जनसुवाणी घेणे योग्य ठरेल अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या माजी आमदार ॲड. सौ. हुस्नबानू खलिफे यांनी दिली आहे.

राजापुरात अशा प्रकारे प्रकल्पांच्या माध्यमातुन शासन अस्थिरता व असुरक्षितता निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

राजापूर तालुक्यात नाणार व सागवे हमदरा घोडेपईवाडी प्रस्तवित असलेल्या बॉक्साईड उत्खनन प्रकल्पांच्या जनसुनावणीला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अनिश्चत काळासाठी स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमिवऱ माजी आमदार ॲड. सौ. खलिफे यांना विचारले असता त्यांनी या प्रकल्पाबाबत जनतेला तेथील शेतकऱ्यांना योग्य माहिती देणे आवश्यक आहे. नेमका हा प्रकल्प काय आहे? किती प्रमाणात या ठिकाणी बॉक्साईट आहे? किती शेतकऱ्यांच्या जमिनीत ते आहे, याचा शेतकरी व स्थानिकांना काय फायदा आहे याबाबत माहिती देणे आवश्यक आहे, स्थानिकांच्या व शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन होणे आवश्यक आहे. यासाठी थेट जनसुनावणी घेण्याऐवजी अगोदर याबाबत विस्तृत माहिती द्यावी आणि मग जनसुनावणी घ्यावी अशी आपली भूमिका असल्याचे ॲड. सौ. खलिफे यांनी सांगितले.

शासनाची ही जबाबदारी आहे, मात्र तसे न करता शासन राजापूरात अशा प्रकल्पांच्या माध्यमातुन अस्थितरता निर्माण करण्याचा, जनतेमध्ये नाहक अस्वस्थता परसविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ॲड. सौ. खलिफे यांनी केला आहे.