फोटोग्राफीतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची होणार माहिती
राजापूर (वार्ताहर): जागतीक ‘फोटोग्राफी डे’ चे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा आणि राजापूर तालुका फोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स असोसिएशनच्या वतीने शनिवार १७ जुलै रोजी राजापूर येथे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छायाचित्रकारांच्या ‘फोटो फेअर’ स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या जोडीनेच फोटोग्राफी क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि एक्सेसेरीजची माहिती देणाऱ्या कंपनीची स्टॉल्स देखील या ठिकाणी असणार आहेत.
मेनरोड वरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळात हा स्नेहमेळावा भरत आहे. या मेळाव्याचे उद्घाटन सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत व माजी आमदार अॅड. सौ. हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलिस निरीक्ष्क राजाराम चव्हाण, राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, अॅड. राकेश भाटकर, राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षा सौ. अनामिका जाधव, शिवसेना राजापूर लांजा विधानक्षेत्र प्रमुख सुनिल उर्फ राजू कुरूप, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, राजापूर तालुका बौध्दजन संघाचे ग्रामिण अध्यक्ष महादेव गोठणकर आदी उपस्थीत राहणार आहेत.
दुपारच्या सत्रात दुपारी २ वाजता छायाचित्रकारांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार डॉ. राजन साळवी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यशाळेत मुंबई येथील फोटोशॉप एक्सपर्ट प्रविण बनसोडे हे वेडींग अल्बम आणि पोस्टर डिझाईन तसेच फोटोशॉप ए आय टेक्नॉलॉजी या विषयी मार्गदर्शन करणार आहेत.
रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स असोसिएशनच्या वतीने दरवर्षी अशा स्नेहमेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हा बहुमान राजापूर तालुका फोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स असोसिएशनला प्राप्त झाला आहे. या स्नेहमेळाव्याला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनशे फोटोग्राफर व व्हिडीओग्राफर उपस्थीत राहतील असे नियोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने आयोजित कार्यशाळेला आणि विविध कंपन्यांच्या स्टॉलला भेट देण्याचे आवाहन रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय शिंदे व पदाधिकारी तसेच राजापूर तालुका फोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेश खांबल व पदाधिकारी सदस्यांनी केले आहे.











