चिपळूण संघ शाखा ग्रामीणचा एकमुखाने ठराव
विधानसभेत दखल घ्यायला भाग पाडणार
चिपळूण (वार्ताहर ) : गेले अनेक वर्ष पूर्वी कुणबी समाजाला लोकसभा आणि विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व प्राप्त झालेले नाही. कुणबी समाजाचे राजकीय अस्तित्व नसल्यामुळे समाजाचा विकास खुंटत आहे. याची जाणीव झाल्याने आता जो राजकीय पक्ष या विधानसभेसाठी कुणबी समाजाला उमेदवारी देईल, त्या पक्षाच्या मागे समाज ठामपणे उभा राहील असे कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा चिपळूण ग्रामीणच्या बैठकीत सर्वांमध्ये ठरवण्यात आले.
संघ शाखा चिपळूण ग्रामीणची मासिक सभा खेर्डी येथील स्व. माधवराव बाईत वस्तीगृहात पार पडली. या सभेत कुणबी समाजाचे राजकीय अस्तित्वाबाबत चर्चा करण्यात आली. गेली अनेक वर्ष राजकीय पटलावरती कुणबी समाजाचे अस्तित्व शून्य आहे. कुणबी समाज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बहु संख्येने आहे. मात्र या समाजाकडे राजकीय पक्ष जाणून बुजून दुर्लक्ष करतात. कुणबी समाजाची मते मिळवण्यासाठी समाजातील पुढाऱ्यांना हाताशी धरत मते मिळवण्यासाठी विधानसभा आणि लोकसभा व इतर निवडणुकीत फक्त कुणबी समाजाचा वापर केला जातो. मात्र आता कुणबी समाजात सुद्धा मोठ्या प्रमाणात सामाजिक जागृती बरोबर राजकीय जागृती सुद्धा होत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कुणबी समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी कुणबी समाज एकत्रितपणे आक्रमक होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जो राजकीय पक्ष समाजातील व्यक्तीला उमेदवारी देईल त्या राजकीय पक्षाच्या मागे चिपळूण तालुक्यातील समाज उभा राहील . मात्र राजकीय पक्षांनी कुणबी समाजाच्या राजकीय अस्तित्वासाठी संधी देणे गरजेचे आहे. ज्या ज्या पक्षात कुणबी बांधव कार्यरत आहेत त्यांनी आपल्या राजकीय पक्षाकडे उमेदवारीसाठी मागणी करावी, असेही या बैठकी ठरवण्यात आले.
चिपळूण संगमेश्वर विधानसभा व गुहागर विधानसभा किंवा इतर विधानसभांमध्ये कुणबी समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी कुणबी समाज प्रयत्नशील आहे. राजकीय पटलावर समाजाचे अस्तित्व नसल्याने सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रांमध्ये समाजाचा विकास होत नाही. आपला हक्काचा प्रतिनिधी नसल्यामुळे समाजाच्या विकासाची गती खुंटली आहे. या सर्व बाबींचा विचार करता चिपळूण संघ शाखा ग्रामीण यांच्यावतीने सर्वानुमते असे ठरवण्यात आले की जो राजकीय पक्ष कुणबी समाजाला उमेदवारी देईल त्या पक्षासोबत समाज राहील आणि उमेदवार जिंकून आणण्यासाठी समाज एक दिलाने कार्य करील. नाहीतर समाज योग्य तो निर्णय घेऊन आपली ताकद दाखवेल असे सर्वांनी ठरवले. या बैठकीला संघ शाखा चिपळूण ग्रामीणचे पदाधिकारी उपस्थित होते.










