स्थानिकांशी चर्चा करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व पर्यटनमंत्र्यांचे लक्ष वेधणार
सावंतवाडी । प्रतिनिधी :
शिरोडा वेळागर येथे होत असलेल्या ताज प्रकल्पाला आमचा कोणताही विरोध नाही. जिल्ह्यात असे पर्यटन प्रकल्प यायलाच हवेत अशी आमचीही इच्छा आहे. मात्र, स्थानिकांना बेघर करून कोणताही प्रकल्प होऊ नये ही आमची भूमिका असल्याचे, भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिरोडावेळागर येथील ताज हॉटेल प्रकल्पामुळे बाधित स्थानिक १५ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर उपोषणास बसणार आहेत. तसेच येथील महिला व मुले खाडीत उभे राहून या उपोषणाला पाठिंबा देणार आहेत. ते ज्या जागेत राहत आहेत त्यांची घरे व मंदिरे आहेत ती ९ हेक्टर जागा त्यांना सोडा तसेच या पर्यटन प्रकल्पामुळे असलेल्या इतर ग्रामीण पर्यटनामध्ये त्यांना सामावून घ्या अशी आमची मागणी आहे. त्यांचाही या प्रकल्पाला विरोध नसून चर्चेतून हा प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे यासंदर्भात स्थानिकांशी चर्चा करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
गोव्यासारख्या पर्यटक राज्यात असलेला ताज हॉटेलचा प्रकल्प हा केवळ ६६ एकर मध्ये आहे. इथे स्थानिकांची वस्ती असलेली ९ हेक्टर जागा जरी सोडली तरी १२० एकर जागा प्रकल्पासाठी शिल्लक राहत आहे. ती देण्यास स्थानिकांचा कोणताही विरोध नाही. स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्यास हा प्रश्न नक्कीच सुटू शकतो. मात्र तसे न केल्यानेच त्यांनी भूमापन प्रक्रियेस विरोध केला तसेच उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. यांची बाजू ऐकून घेणे ही गरजेचे आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आंबोली गेळे येथील कबुलायतदार गावकर प्रश्न देखील अशाच प्रकारे स्थानिकांना विश्वासात न घेतल्यानेच खोळंबला आहे. त्यामुळेच स्थानिक आमदारांना तेथील जनतेचा विरोध वाढत आहे. गेळे नंतर आता चौकूळवासियांनी देखील विरोधी भूमिका घेतली आहे. प्रत्येक ठिकाणी मीच असायला हवे व मीच समस्या दूर केली हा अट्टाहास असल्यानेच स्थानिकांचे प्रश्न मार्गी लागण्यात अडचणी येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. सर्व गोष्टी मीच केल्या, समस्या मीच सोडवल्या या मंत्री दीपक केसरकर यांच्या अट्टाहासामुळेच व श्रेयवादाच्या दूराग्रहामुळेच आज जनतेचे अनेक प्रश्न खोळंबले आहेत. इतर वेळा युतीच्या गोष्टी सांगणाऱ्या केसरकरांनी ‘आम्ही ‘ म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन जर काम केले असते तर जनतेचे प्रश्न निकाली लागले असते, असा आरोपही राजन तेली यांनी केला.
चौकुळ येथील कबुलायतदार गांवकर प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे.हा प्रश्न मार्गी लागावा स्थानिकांना त्यांच्या जमिनी परत मिळाव्यात ही आमची देखील भूमिका आहे. असे असताना सावंतवाडी मतदारसंघातील जनतेसाठी पालकमंत्र्यांनी जनता दरबार बोलवला असताना त्याच दिवशी जिल्हाधिकारी तसेच वन अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन या प्रश्न मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावणे हे योग्य आहे का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या समितीवर त्या त्या भागातील महिला पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सावंतवाडी मतदारसंघातील समितीवर श्वेता कोरगावकर यांची नेमणूक केलेली असताना त्या जागी आपले नाव घेण्याचा दुराग्रह का केला जात आहे. अशा दुराग्रही भूमिकेमुळेच या मतदारसंघातील जनतेचे मोठे नुकसान होत असून जनता त्रस्त झाली आहे. भाजप सोबत त्यांची युती असली तरीही सर्वकाही मीच केले ही भूमिका घेतल्याने महायुतीचेही नुकसान होत आहे. तुम्ही तुमचे अधिकार वापरा मात्र पालकमंत्र्यांना त्यांचे अधिकार वापरू द्या हीच आमची भूमिका आहे. त्यामुळे युती असली तरीही ज्या व्यक्तीमुळे जनतेचे नुकसान आहे त्या व्यक्तीच्या उमेदवारीला आमचा ठाम विरोध राहील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.











