Upazila Hospital mortuary freezer closed again
देव्या सूर्याजी यांची याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी
वैद्यकीय अधीक्षकांचे वेधले लक्ष
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहातील नव्यानं बसविण्यात आलेला फ्रीजर पुन्हा बंद पडला असून फ्रीजर कुलिंग देत नसल्यानं तो निरूपयोगी ठरत आहे. यामुळे आपत्कालात मृतदेह ठेवायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य सेवेतील अभावामुळे जिवंतपणी होणारा त्रास मेल्यानंतरही पाठ सोडत नसल्याचेच यातून दिसत आहे. संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. नव्यान बसविलेला फ्रीजर कुलिंग देत नसेल तर त्या व्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी वैद्यकीय अधिक्षकांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केली आहे.
गतवेळी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर बांधकाम व रुग्णालय प्रशासनाने तातडीने ह्याची दखल घेतली होती. नव्यानं फ्रीजर बसविला. परंतु, उपजिल्हा रुग्णालयात असलेला शवागृहातील कुलिंग न देत असल्यानं तो कुचकामी ठरत आहे. रात्री-अपरात्री मृतदेह ठेवायचा कुठे हा सवाल यामुळे निर्माण होत आहे. नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जीवंतपणी होणारे हाल समोर असतानाच आता मेल्यानंतरही मृतदेहांची अवहेलना होत आहे. यासंदर्भात तातडीन उपायोजना करावी व कुलिंग न देणाऱ्या नव्या फ्रीजरच्या व्यवहाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली आहे.
तर शवगृहाच्या इमारतीच्या सुधारणेसाठी बांधकाम विभागाचही लक्ष त्यांनी वेधलं आहे









