मुलांसोबत जागविल्या आजोळच्या बालपणातील आठवणी
सावंतवाडी । प्रतिनिधी : सुप्रसिद्ध संगीतकार, गीतकार, गायक तसेच चित्रपट निर्माते दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी आपल्या आजोळच्या मळगांव हायस्कूलला भेट दिली. मळगाव हायस्कूल येथील ‘गुरुवर्य गुरुनाथ पाटकर प्रतिष्ठान ‘ आयोजित शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहत शालेय विद्यार्थ्यांना सुखद धक्का दिला. आपल्या भाषणात बालपणातील आजोळच्या आठवणींना उजाळा दिला. तर मुलांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांना ‘गुप्ते ‘ स्टाईल मध्ये दाद देत मुलांचेही कौतुक केले.
अवधूत गुप्ते यांचे मामा गुरुवर्य गुरुनाथ पाटकर प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी सावंतवाडी तालुक्यातील मळगाव इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जाते. अवधूत गुप्ते यांचे मामा प्रा. अनिल सामंत दरवर्षी या कार्यक्रमाला उपस्थित असतात. मात्र, यावर्षी स्वतः अवधूत गुप्ते या कार्यक्रमाला आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित राहिल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक पालक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनाही आनंद झाला.
सिने सृष्टीतील आघाडीचे संगीतकार गीतकार गायक चित्रपट निर्माते म्हणून प्रसिद्ध असलेले अवधूत गुप्ते हे दरवर्षी गणेशोत्सवात आपल्या आजोळी म्हणजेच मळगाव पिंपळवाडी येथील पाटकर यांच्या निवासस्थानी आवर्जून येत असतं. अलीकडेच काही वर्षांपूर्वी पाटकर यांच्या कुटुंबीयांनी आपला गणपती मुंबई येथे हलविल्यानंतर ते आजोळी आले नव्हते. मे महिन्यात सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर झालेल्या एका कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अवधूत गुप्ते यांनी आजोळच्या आठवणींना उजाळा दिला होता. कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणून त्यांची ख्याती असली तरीही यशाच्या शिखरावर असून देखील जिथे बालपण गेले त्या कोकणच्या मातीला व विशेषतः मळगाव गावाला ते कधीही विसरले नाहीत.
दोनच महिन्यांपूर्वी त्यांच्या मातोश्री मृदगंधा गुप्ते यांचं निधन झालं होतं. त्यांची प्रतिमा अवधूत गुप्ते यांनी मळगाव येथील कार्यक्रमात सोबत आणली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच या प्रतिमेचे देखील पूजन करण्यात आले. मळगाव ऐक्यवर्धक संघाचे सचिव आर. आर. राऊळ यांनी अवधूत गुप्ते यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार केला. यावेळी प्रशालेच्या मुलांनी सादर केलेले स्वागत गीत तसेच आंतरराज्य पद्धतीने वेश परिधान करीत केलेले अनोखे स्वागत अवधूत गुप्ते व त्यांच्या कुटुंबीयांना भावले. या सर्व मुलांचे त्यांनी मनापासून कौतुक केले.
गुरुवर्य गुरुनाथ पाटकर प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी मळगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. मामाचा हा वारसा अवधूत गुप्ते यांनी पुढे चालू ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर गुप्ते यांनी विद्यार्थ्यांच्या गणवेशाकरिता तसेच इतर शैक्षणिक साहित्याकरिता रोख देणगी प्रशालेच्या संस्था पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली.
यावेळी संस्थेचे सचिव आर आर राऊळ, संस्था संचालक रामचंद्र केळुसकर, स्कूल कमिटी अध्यक्ष मनोहर राऊळ, मुख्याध्यापक मारुती फाले, अवधूतचे मामा तथा गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, वडिल आनंद गुप्ते व पत्नी गिरीजा यांच्यासह अन्य नातेवाईक, प्रशालेचे पर्यवेक्षक, शिक्षक व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर अवधूत गुप्ते यांनी मळगाव हायस्कूलच्या नव्याने बांधलेल्या कै. गोपिका बाबणी शिरोडकर रंगमंचाला भेट दिली. यावेळी त्यांनी याच रंगमंचावर आपल्याला एक दिवस कार्यक्रम करायचा आहे असे सांगत भविष्यात इथे कार्यक्रम करणार असे आश्वासित केले. त्यामुळे मळगाव हायस्कूलची मुले आणि कर्मचारी वृंद आनंदित झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष, सदस्य, शिक्षकवृंद व बांदा पानवळ कॉलेजचे प्रा. शरद शिरोडकर उपस्थित होते.










