महाराष्ट्रातील महिला, मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचा लांजातील महिलांकडून निषेध 

 लांजा तहसीलदारांना निवेदन, कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची केली मागणी 

लांजा (प्रतिनिधी) महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेचा निषेध करत लांजा तालुक्यातील महिला वर्गाच्या वतीने आज शुक्रवारी लांजा तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. तसेच घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली .

तहसीलदार प्रमोद कदम यांना सादर करण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना दुसरीकडे मात्र देशभरात महिला, मुलींवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. कलकत्ता येथील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्काराची घडलेली घटना ताजी असतानाच बदलापूर येथील शाळेत शिकणार्या दोन चिमूरड्या मुलींवर शाळेमध्ये अत्याचार करण्यात आला होता. त्या पाठोपाठ पुण्यातील एका नामांकित शाळेतील मुलीचा विनयभंग करण्यात आला होता. संस्कृतीचे माहेरघर समजले जाणारे पुणे या घटनेने हादरून गेले आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आणि म्हणूनच या पुरोगामी महाराष्ट्रातील चिमूरड्या मुली, महिला आणि माता भगिनींवर होणाऱ्या अत्याचाराचा आम्ही निषेध करतो. या विकृतीला लवकर लवकर कठोर शिक्षा व्हावी आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आवश्यक बदल करून अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडून नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे .

सदर निवेदन सादर करताना लिला घडशी, शमा थोडगे, धनिता चव्हाण ,दिपाली साळवी, अलका धुमाळ, विनया कुष्टे, सौ अश्विनी नाटेकर, सुनिता दुडये ,स्वप्नाली सुतार, कल्पना पवार, वैशाली कांबळे, अनिता कांबळे, स्नेहा बापर्डेकर, रिया खानविलकर, पूर्वा मुळ्ये , मनीषा गांगण ,सुनीता गुरव ,छाया रसाळ आणि उपस्थित होते.