‘सुपरफास्ट’ दर्जासाठी वाढीव थांबे देण्यास रेल्वेचा नकार ?

 

खेड(प्रतिनिधी) आठवड्यातून दोनवेळा धावणाऱ्या नागपूर – मडगाव स्पेशलला कोकण मार्गावर दिलेल्या थांब्याव्यतिरिक्त अन्य रेल्वे स्थानकांवर थांबे देण्यास असमर्थताच दर्शवण्यात आल्याचे समोर आले आहे. या स्पेशलला मुदतवाढीसह कोकण मार्गावर कायमस्वरूपी करणे किंवा थांबे देणे हे मध्य व रेल्वे बोर्डाच्या अधिकार कक्षेत येत असल्याचे सांगत कोकण रेल्वेने नकार घंटा वाजवली आहे

विदर्भ, खान्देश व कोकणाला जोडणाऱ्या ०११३९ / ०११४०
क्रमांकाच्या नागपूर – मडगाव स्पेशलला कोकण मार्गावर प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. वाढता प्रतिसाद लक्षात घेत स्पेशलला अनेकदा मुदतवाढही देण्यात आली. या स्पेशलला अतिरिक्त थांबे देवून कायमस्वरूपी करण्याची मागणी शेगाव येथील राष्ट्रीय रेल्वे प्रवाशी संघटनेने केंद्रीय रेल्वेमंत्री, कोकण रेल्वे व रेल्वे बोर्डाकडे केली होती. या स्पेशलला कोकण मार्गावर वीर, आडवली, विलवडे, वैभववाडी नांदगाव, सिंधुदुर्ग, सावंतवाडी आदी स्थानकात थांबा देण्यासाठीही आग्रह धरण्यात आला होता. दरम्यान या

मार्गावरील लांबपल्ल्याच्या गाड्यांचा ‘सुपरफास्ट’ दर्जा राखण्यासाठीच स्पेशलला आलटून-पालटून मोजकेच थांबे देण्यात आले आहेत. नागपूर – मडगाव स्पेशलला यापूर्वी सावंतवाडी स्थानकावर थांबा होता. मात्र प्रवासी संख्या सर्वाधिक असूनही स्पेशलचा थांबा काढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वास्तविक या स्पेशलमधून विदर्भ व खान्देशातील पर्यटक कोकणात येत असतात. सावंतवाडीत पर्यटनस्थळे देखील भरपूर आहेत. मात्र सावंतवाडीचा थांबा पूर्ववत न झाल्याने गैरसोय होत आहे.