खेड मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवे सभागृहाचे भूमीपूजन

 

 

खेड(प्रतिनिधी) शहरातील शिवतररोड येथील सम्राट अशोकनगर येथे आमदार योगेश कदम यांच्या पाठपुराव्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाची नव्याने उभारणी करण्यासाठी ३ कोटी ४१ लाख ७५ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या सभागृह कामाचे भूमिपूजन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते शनिवारी पार पडले.

यापूर्वी येथे डॉ. बाबासाहेब अबिडकर सभागृह उभारण्यात आले होते. मात्र सभागृहाच्या देखभालीकडे नगरप्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याने त्याची पडझड झाली होती. सभागृह बंद पडल्याने भीमसैनिकांसह स्वयंसेवी संस्थांची परवडच सुरू होती.

सभागृहाच्या दुरुस्तीसाठी रिपाइंच्या कार्यकर्त्यांसह शिवतररोड परिसरातील भीमसैनिकांनी सातत्याने नगरप्रशासनाकडे पाठपुरावा देखील केला. मात्र नगरप्रशासनाने दाद दिली नाही. अखेर धोकादायक स्थितीतील सभागृह पूर्णपणे जमिनदोस्त झाले. सम्राट अशोकनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाची नव्याने उभारणी करण्यासाठी रिपाईचे कोकण प्रदेश युवक अध्यक्ष सुशांत सकपाळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आमदार योगेश कदम यांच्याकडे निवेदन सादर केले होते.

शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार कदम यांनी भेट घेत नवीन सभागृह बाधण्यासाठी निधी देण्याचे साकडे घातले होते. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधण्यास ३ कोटी ४१ लाख ७५ हजार रुपयांच्या प्रशासकीय निधीस मंजुरी मिळाल्याने सभागृह बांधण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

खेड दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आठवले व शिवसेना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत सभागृह बांधकामाचे भूमिपूजनही पार
पडल्याने भीमसैनिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

याप्रसंगी आमदार योगेश कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, शहरप्रमुख कुंदन सातपुते, रिपाइंचे कोकण प्रांत अध्यक्ष प्रकाश मोरे, प्रदेश युवक अध्यक्ष सुशांत सकपाळ जिल्हाध्यक्ष प्रितम रुके, तालुकाध्यक्ष संतोष कापसे, युवकचे तालुकाध्यक्ष विकास पुत्रे, गणेश शिर्के, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, माजी नगरसेवक सतीश चिकणे, मिनार चिखले, पांडुरंग माने, उपशहरप्रमुख स्वप्निल सैतवडेकर, दीपक नलावडे यांच्यासह शिवसेना व रिपाईचे पदाधिकारी उपस्थित होते.