आकाशवाणी रत्नागिरीवर शुक्रवारी माजी आ. बाळ माने यांची मुलाखत

 
 
 ‘परदेशी रोजगाराची रुंदावणारी क्षितिजे’ या विषयावर दिली महत्वपूर्ण माहिती 

रत्नागिरी :

माजी आमदार, रत्नागिरी भाजपाचे वरिष्ठ नेते आणि यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बाळासाहेब माने यांची आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर ‘परदेशी रोजगाराची रुंदावणारी क्षितिजे’ या विषयावरील मुलाखत इंद्रधनुष्य या सदरात प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ मुलाखतकार श्री. सुहास विद्वांस ही मुलाखत घेणार असून मुलाखतीचे प्रसारण येत्या शुक्रवारी म्हणजेच दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी सायं. ०६:३५ वा. करण्यात येणार आहे.

 

 

देशांतर्गत रोजगार मिळवण्यात अडचणी येत असतानाच वैद्यकीय आणि नर्सिंग क्षेत्र मात्र भरमसाठ पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध करून देत आहे. कोविड-१९ नंतर भारतीय सुश्रुषा पद्धती आणि सेवकांचे जगभर कौतुक होत असतानाच आता परदेशात भारतीयांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. याचाच अर्थ आता परदेशात नोकरी करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे. या विषयावर बाळ mane यांनी अत्यंत विस्तृत माहिती दिली असून परदेशी नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाल्यास त्याचा सकारात्मक विचार करण्याचे तरुणाईला आवाहन केले आहे.

 

याव्यतिरिक्त परदेशी नोकऱ्या मिळवताना पूर्वी येणाऱ्या अडचणी व २०१४ नंतर केंद्र व राज्य सरकारांनी त्या दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच सध्या महायुती सरकारने परदेशी नोकरीच्या उपलब्ध करून दिलेल्या संधी यांबाबत जनजागृती करतानाच, “मातृभूमी प्रिय असणे हे राष्ट्रभक्तीचे लक्षण असले तरी परदेशी (एनआरआय) राहून मायभूमीची सेवा करता येते.” असा सल्लाही दिला आहे. ही मुलाखत आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या ११४३ कि.हर्ट्झवर आणि न्यूजऑनएआयआर या मोबाईल अॅपवर जगात सर्वत्र ऐकायला मिळेल.