उपमुख्यमंत्री अजित पवार यांची किल्ले राजकोट येथे माहिती
मालवण | प्रतिनिधी : राजकोट किल्ला येथे पुन्हा भव्यदिव्य असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारले जाईल. मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मालवण राजकोट किल्ला येथे बोलताना दिली.
दरम्यान, राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडली त्या संपूर्ण प्रकाराची खोलात जाऊन चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल. असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
राजकोट किल्ला येथे भव्य स्मारक उभारण्याबरोबरच किल्ला परिसराचा विकास करण्यासाठी बाजूला असलेले जे खासगी जमिनमालक आपल्या जमिनी देण्यास तयार असतील त्या जागा घेण्याचा विचार सुरू असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी राजकोट किल्ल्यावर भेट दिली. शिवरायांचा पुतळा कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूसे, तहसीलदार वर्षा झालटे, मुख्याधिकारी संतोष जिरगे, सार्वजनिक बांधकाम सहाय्यक अभियंता अजित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अबीद नाईक, काका कुडाळकर, प्रफुल्ल सुद्रिक, सुरेश गवस, नाथ मालोंडकर, शिवसेना पदाधिकारी बबन शिंदे, राजा गावकर, किसन मांजरेकर, एम. के. गावडे, प्रज्ञा परब यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. अनेक ठिकाणी महाराजांचे अश्वारूढ, सिंहासनावर बसलेले, उभे असलेले पुतळे उभारण्यात आले आहेत. सर्वजण त्यांना आदराने नतमस्तक होतात आणि त्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळत असते. राजकोट किल्ला येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात त्याच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या. मात्र सरकारच्या वतीने महाराजांच्या नावाला साजेसे असे स्मारक येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे. अत्यंत गांभीर्याने या विषयाकडे लक्ष देण्यात आले आहे.
प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार त्याचप्रमाणे या क्षेत्रातील अनुभवी रचना सल्लागार, स्ट्रक्चरल ऑडिटर हे सुद्धा या ठिकाणी भेट देतील ते सुद्धा आपली मते तपास यंत्रणेला देतील. सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री याबाबतचा सर्वांशी बोलून निर्णय घेतील. जे ठरविले जाईल ते अंतिम असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.












