केंद्रीय मंत्री रामदास आठवले ; घटनेचे राजकारण करणाऱ्यावर ही केली टीका
मालवण | प्रतिनिधी : राजकोट किल्ला येथे शिवस्मारक व्हावे. एक भव्य पुतळा उभारून किल्ल्याला पुर्नजिर्वीत करणे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. ही नौदल व राज्य शासनाची भावना चांगली होती. त्याप्रमाणे त्यांनी आवश्यक ते सहकार्य केले आहे. मात्र पुतळ्याची निर्मिती चुकीची करण्यात आल्याने ही दुर्घटना घडली. यात राज्य शासनाला दोषी ठरविणे योग्य नाही. आता पुन्हा नव्याने पुतळा उभा करणे आणि शिवप्रेमींना पुन्हा आदराचे स्थान निर्माण करणे हे महत्वाचे आहे. शिवपुतळा दुर्घटना ही दुदैवीच घटना आहे. या घटनेवर राजकारण होता नये. अशी ठाम भूमीका केंद्रीय सामाजिक न्याय विभाग राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत मांडली.
दरम्यान, शिवपुतळा बनविणाऱ्यांकडून मोठी चूक झाल्यानेच ही दुर्घटना घडली असेल किंवा जे यात दोषी असतील अशा चुकीला माफी नसून यातील दोषींना थेट फाशीचीच शिक्षा द्यायला हवी. असेही आठवले म्हणाले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी दुपारी राजकोट किल्ला येथे भेट देत शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेची माहिती घेत पाहणी केली. त्यांनतर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्राय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांसोबत रमाकांत जाधव राज्य सह सचिव, अजित कदम जिल्हाध्यक्ष, सुशांत सकपाळ कोंकण प्रदेश युवक अध्यक्ष, सतीश कोरगांवकर गोवा अध्यक्ष , बाळा बनसोडे गोवा राज्य प्रभारी, शंकर उसपकर कोंकण प्रदेश सह सचिव, प्रकाश कांबळे जिल्हा सरचिटणीस, आनंद पेंडुरकर जिल्हा कोशाध्यक्ष, सखाराम कदम कार्याध्यक्ष, चंद्रकांत जाधव जिल्हा उपाध्यक्ष, प्रशितोष कदम रत्नागिरी युवक जिल्हाध्यक्ष, ज्योती जाधव महिला बालकल्याण सभापती दोडामार्ग, सर्व तालुकाध्यक्ष सिंधुदुर्ग, पदाधिकार व कार्यकर्ते तसेच रत्नागिरी मधील सर्व युवक पदाधिकारी व गोवा राज्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ते म्हणाले, सर्वांनी एकत्रित होवून घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यातील दोषींचा शोध घेऊन त्यांना कडक शासन होण्यासाठी शासन यंत्रणांना सहकार्य करायला हवे. विरोधकांकडून फक्त टिका आणि राजकारण हिच भुमीका घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून अशाप्रकारची संयुक्त समिती गठीत करण्याच्या सूचना करू असेही श्री. आठवले यांनी सांगितले.

पुतळा हा फक्त चुकीच्या पद्धतीनेच केलेल्या निर्मितीमुळेच कोसळला आहे. यात पुतळा उभारणारी व्यक्ती दोषी असून त्याचा शोध घेऊन यातील इतरही दोषींची नावे समोर यायला हवीत. अशा घटनेमुळे संपूर्ण देशाला दुखः झाले आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माफी मागितली आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनीही माफी मागितली आहे. असे असतानाही विरोधक नाहकपणे आरोप करत सुटले आहेत. पोलीसांकडून याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री यांनीही याबाबत तात्काळ गुन्हे दाखल करून संशयीतांना ताब्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे शासन गांभिर्याने याकडे पाहत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासपुरुष
संरक्षण, रेल्वे, रस्ते यामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाले आहे. आज भारताला जगात मानाचे स्थान मिळाले आहे. गेल्या दहा वर्षात केलेल्या नरेंद्र मोदींच्या कार्यामुळे पुन्हा तिसऱ्यांदा एनडीएची सत्ता देशात आली आहे. विरोधकांनी संविधान बदलणार असा खोटा प्रचार केल्याने काही राज्यात आम्हाला फटका बसला आहे. तरीही काही राज्यांनी विकासासाठी मतदान केल्याने आज देशात पुन्हा एकदा तिसऱ्यांदा स्थिर सरकार आले आहे. नरेंद्र मोदी हे कोणताही निर्णय घेताना विचाराअंतीच घेत असतात. त्यांनी आज गरीबांसाठी, शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक काम केले आहे. यामुळे विरोधकांनी कितीही चुकीचा आणि खोटा प्रचार केला तरी एनडीए सरकारला कोणताही धोका पोहचणार नाही.
राज्यात कोणताही मुद्दा नसल्याने विरोधकांकडून नाहकपणे टिका करून आंदोलन केली जात आहेत. आम्ही राज्यात पुन्हा सत्तेत येणार आहोत. १८० जागांचे लक्ष आमचे असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. महायुती एकसंघपणे या निवडणुकीत उतरणार आहे. महाराष्ट्रातही आमची ताकद आहे. महायुतीच्याबाजूने आम्ही खंबीरपणे उभे आहोत. कोकणात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रकाश मोरे आणि रमाकांत जाधव यांच्याकडे जबाबदारी दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.










