गणेशोत्सवास परवा पासून प्रारंभ
भक्तिमय वातावरणात व शांततेत गणेशोत्सव साजरा करू – जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल
सिंधुनगरी | प्रतिनिधी
कोकणातील गणेशोत्सवाला विशेष महत्त्व असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग पोलीस दलाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या शांतता समितीच्या बैठका घेतल्या आहेत व पोलिस संचलनही झाले आहे. शनिवारी ७ सप्टेंबर ला गणरायाचे आगमन घराघरात होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ७२ हजार ७८९ घरगुती( खाजगी) गणपती तर ३२ ठिकाणी सार्वजनिक गणपती विराजमान होणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी गणेशोत्सव काळात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त, वाहतुकीचे नियोजन, व शांतता समितीच्या बैठका घेऊन मार्गदर्शन केले आहे.
जिल्ह्यात भक्तीभावाने साजरा होणाऱ्या या गणेशोत्सवा साठी मुंबई पुणे व अन्य शहरातून जिल्हावासीय नागरिकांचे आगमन सुरू झाले आहे. जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी होत असून रेल्वे स्थानके व बस स्थानके नागरिकांच्या गर्दीने भरून गेली आहेत. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांच्या आरोग्य तपासणीसाठी एस टी बस व रेल्वे स्थानकावर १८ ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत तर चाकरमान्याची गैरसोय होऊ नये. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सर्व बस व रेल्वे स्थानके ,महामार्ग आणि सर्व घाट मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील गणेशोत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था बिघडू नये किंवा वाहतुकीची कोंडी कुठेही होऊ नये. यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. गणेशोत्सवाला मोठ्या प्रमाणात चाकरमानी येत असल्याने जादा रेल्वे,एसटी,खाजगी बस मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात चाकरमानी यायला सुद्धा सुरुवात झाली आहे .यावर्षी खाजगी घरगुती गणपती ७२ हजार ७८९ विराजमान होणार आहेत तर सार्वजनिक गणपती ३२ विराजमान होणार आहेत. अशी माहिती पोलीस खात्याच्या अहवालातून उपलब्ध झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणतः दीड ते अकरा दिवसापर्यत गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत असतो. यावर्षी जास्तच उत्साह दिसून येत आहे .
जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून घराची रंगरंगोटी व सजावट सुरू आहे बाजारापेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे. गणेशमूर्ती शाळा मध्ये रंगरंगोटीचा अंतिम हात फिरवला जात आहे. केवळ बाप्पाच्या आगमनाची वाट पाहिली जात आहे.
७ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी आधीपासूनच चाकरमानी व गणेशभक्त येऊ लागल्याने येणाऱ्या चाकरमान्यामधून तापाची व इतर आजाराची लक्षणे दिसणाऱ्याची आरोग्य तपासणी करण्यासाठी सर्व रेल्वे स्थानके,बस स्थानकावर १८ आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत आरोग्य तपासणी करून जोखीनीच्या रुग्णांना जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले जाणार आहे.
कुठेही अनुचित प्रकार घडू नये,कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी घेऊन आनंदात गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर गणेशभक्ताची गैरसोय होऊ नये याची वाहतुकीची कोंडी होऊ नये याची दक्षता घेण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत. सर्वजनिक मंडळांनी ध्वनी प्रदूषण होता नये याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे तर जिल्हाधिकाऱ्याच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व रेल्वे व बसस्थानके ,फिक्स पॉइंट ,भुईबावडा, करूळ ,फोंडा ,आणि आंबोली या घाट मार्गावर व महामार्ग या सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे गणेशोत्सव काळात अपघात होऊ नये यासाठी महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
महामार्गावरून प्रवास सुखकर होण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत .
एकूणच गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडावा यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे तर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सर्वांची लगबग सुरू असून जोरदार तयारी सुरू आहे.तर गणेशोत्सव काळांत कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनीही कड़क पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. यावर्षी एस टी स्थानक व रेल्वे स्थानकावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
३२ ठीकानी सार्वजानिक गणपती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग- ३,सावंतवाड़ी ५,आचरा १,मालवण २, कणकवली ५,बांदा २,कुडाळ ५, वेंगुर्ला ३, देवगड २, वैभववाडी ४ असे सार्वजानिक गणपतीची स्थापना होणार आहे.
बंदोबस्थासाठी ३२ पोलिस अधिकारी तैनात
गणेशोस्तव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ३२ पोलिस अधिकारी, २१३ पोलिस अमलदार, व ३५० होमगार्ड बंदोबस्थासाठी तैनात ठेवण्यात आले आहेत.
जादा वाहतूक व्यवस्था
एस टी महामंडळा कडून गणेशोत्सवा साठी येणाऱ्या प्रवशासाठी १०४० जादा एस टी फेऱ्या तर रेल्वे प्रशासनाने १३९ रेल्वे फेऱ्या सुरु केल्या आहेत.
या दिवशी रात्री १२ पर्यंत ध्वनि क्षेपणास परवानगी
गणेशोत्सव कालावधीत गणपतीचा पाचवा दिवस, सातवा दिवस, आणि अनंत चतुर्दशी या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनि क्षेपणास परवानगी देण्यात आली आहे तर अन्य दिवशी रात्री १० वाजेपर्यंत परवानगी असेल.
अवजड वाहनांना बंदी
गणेशोत्सव कालावधीत अवजड वाहनांमुळे इतर वाहतुकीला अडचण येऊ नये यासाठी ५ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर, ११ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर, १७ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ८ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र यातून गॅस सिलेंडर, दूध वाहतूक, भाजीपाला, औषधे, जीवनावश्यक वस्तू वाहतुकीला वगळण्यात आले आहे.
रिक्षा चालकांनी वाजवी भाडे घ्यावे
जिल्ह्यातील रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून भाड्याची आकारणी करताना वाजवी भाडे घ्यावे असे आव्हान पोलिसांनी केले आहे. रेल्वे स्थानके बस स्थानके दाखल होणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना रिक्षाचालकाने वाजवी भाडे दरात रिक्षा सेवा द्यावी व कोणत्याही वाद होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आव्हान पोलिसांनी केले आहे.
गणेशोत्सव शांततेत व आनंदात साजरा करा
गणेशोत्सव सर्वानी आनंदात साजरा करावा हा उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासन व जिल्हा प्रशासन सतर्क आहे. त्यासाठी प्रशासनाकडून दिलेल्या सुचनाचे काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करावे —- सौरभ अग्रवाल ,पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग











