लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील साटवली लावगणवाडी येथे भर वस्तीत असलेला आणि गंजून केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत असलेला विद्युत पोल हा अतिशय धोकादायक बनला असून तो तात्काळ बदलण्यात यावा, अशी मागणी साटवली तंटामुक्ती समिती अध्यक्ष चिंतामणी सावंत यांनी केली आहे .
साटवली लावगणवाडी येथे वसंत गुंड्ये यांच्या घराजवळ आणि भर वस्तीत असलेला हा विद्युत पोल गंजून गेला असून तो वादळी वारा किंवा पावसात केव्हाही कोसळून दुर्घटना घडू शकते, अशा धोकादायक स्थितीत तो उभा आहे. या विद्युत खांबावरून आजुबाजु च्या घरांना वीज कनेक्शन देण्यात आलेले आहे. केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत असल्याने तो येथील लोकांसाठी मृत्यूची टांगती तलवार बनू राहिला आहे .
त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या विद्युत पोलाची पाहणी करून तो तात्काळ बदलण्यात यावा, अशी मागणी तंटामुक्ती समिती अध्यक्ष चिंतामणी सावंत यांनी केली आहे. यात चालढकल केल्यास आणि एखादी दुर्घटना घडली तर त्याला सर्वस्वी महावितरण जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे.












