लांजा (प्रतिनिधी) वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे घरावर फणसाच्या झाडाची फांदी पडून घराचे नुकसान झाले. ही घटना तालुक्यातील कुरचुंब खालची गुरववाडी येथे शनिवारी घडली आहे .
शनिवारी ७ सप्टेंबर रोजी तालुक्याच्या पूर्व भागातील कुरचुंब गावात सकाळी ११ चे सुमारास कोसळलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे कुरचुंब खालची गुरववाडी येथील रहिवाशी तानाजी धोंडू गुरव (वय ६५) यांच्या घरावर फणसाच्या झाडाची मोठी फांदी पडून घराचे नुकसान झाले. घराची कौले फुटली व वासे मोडले. त्याचप्रमाणे या घटनेत तानाजी गुरव हे देखील किरकोळ जखमी झाले. या घटनेत गुरव यांचे पंधरा ते वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे .
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी जाऊन भेट देऊन पाहणी केली. जखमी झालेल्या तानाजी गुरव यांना शिपोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यांचेवर प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले. दरम्यान, या घटनेची माहिती महावितरण, महसूल विभाग यांना देखील देण्यात आली आहे.











