ऐन गणेशोत्सवात स्ट्रीट लाईट बंद असल्याने घेतला आक्रमक पवित्रा
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावातील काही भागात ऐन गणेशोत्सवात स्ट्रीट लाईट बंद असल्याने या विरोधात आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयालाच कुंपण घातल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी प्रभारी सरपंच वगळता एकही ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नसल्याने ‘असले सदस्य काय कामाचे? साऱ्यांचा राजीनामा घ्या ‘अशी संतप्त मागणी उपस्थित ग्रामस्थांनी केली.
दरम्यान, गावात सध्या स्ट्रीट लाईटच्या दुरुस्तीसाठी कामगार नसून त्याबाबत दोन वेळा निविदा देण्यात आली होती मात्र कोणीही उपस्थित राहिले नाही. तसेच विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झालेला असल्याने त्या भागातील स्ट्रीट लाईट बंद आहे मात्र महावितरण कडून गावात असलेले दोन्ही वायरमन हे कायमस्वरूपी नसल्याने हा बिघाड काढण्यात आला नाही. झाडी तोडण्यासाठी ही कामगार लावले होते मात्र त्यांनी मध्येच काम बंद केले. याबाबत आपण सातत्याने महावितरण कडे पाठपुरावा करूनही महावितरणने त्याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे ग्रामस्थांचा रोष आपण समजू शकतो असे म्हणणे यावेळी सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनीही आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. मागील सहा महिन्यांपासून स्ट्रीट लाईट बंद आहेत. ग्रामस्थांना अंधारातून जावे लागत आहे. गणेशोत्सवाच्या काळातही स्ट्रीट लाईट सुरू झाली नाही. ग्रामपंचायत कर गोळा करते मात्र ग्रामस्थांना आवश्यक असलेल्या सुविधा जर ते पडू शकत नसतील तर त्यांना कर मागण्याचाही अधिकार नाही अशा शब्दात ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला तसेच त्यांनी गावातील अनेक समस्यांचा पाढा वाचून दाखवला.
यावेळी याबाबत समन्वयाने व शांतपणे आपण प्रश्न सोडवू, असे सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी सांगितले. या प्रसंगी ग्रामस्थ पांडुरंग राऊळ, बाप्पा नाटेकर, ॲड. निधी दाभोळकर, महेंद्र पेडणेकर, माजी ग्राम पंचायत सदस्य गुरुनाथ गांवकर, विलास मळगावकर, गुरुनाथ नार्वेकर, सिद्धेश तेंडुलकर, विश्वनाथ गोसावी, बाळा बुगडे, निलेश राऊळ, प्रेमनाथ राऊळ, लाडू जाधव ,संजय जाधव, महेश शिरोडकर, मयूर गावकर, ज्ञानेश्वर राऊळ, लाडकोबा गांवकर , उल्हास मांजरेकर , राजेश राऊळ , राकेश राऊळ ,ज्ञानेश्वर मळगावकर ,दिलीप कानसे ,शंकर राऊळ, दीपक मळगावकर, महेश राऊळ, सोना गावकर, राजू नाईक, दिनेश नाईक, राजाराम शिरोडकर, सुधाकर तेली, अमोल सावळ, प्रितेश दाभोळकर, सुधाकर नाईक, प्रणव सावळ, कांता सावळ, जयेंद्र जाधव, जयराम राऊळ, विलास जाधव, दीपक जाधव, समीर हरमलकर यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांची भेट : ग्रामस्थांशी चर्चा
मळगाव गावातील स्टेट लाईट बंद असल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला कुंपण घातल्याच्या प्रकाराची माहिती मिळताच माजी आमदार राजन तेली यांनी घटनास्थळी भेट देत उपस्थित ग्रामस्थांशी चर्चा केली. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाचारण करून प्रशासनाचे नेमके काय म्हणणे आहे याबाबत ग्रामस्थांशी थेट चर्चा करून देऊ, असे आश्वासन राजन तेली यांनी उपस्थितांना दिले. भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांनीही या ठिकाणी भेट देत चर्चा केली. तर स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही ग्रामस्थांशी फोनवरून चर्चा करत आपण आल्यानंतर ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.









