कोल्हेवाडी ग्रा.पं. सरपंच, तत्कालीन ग्रामसेवक यांना पाठीशी घालणाऱ्यावर कारवाई करा
ग्रामस्थांची मागणी
लांजा( प्रतिनिधी ) तालुक्यातील कोल्हेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच वैदेही विजय बेंद्रे आणि तत्कालीन ग्रामसेवक चेतन दाभोळकर यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम २९५९ च्या मुंबई अधिनियम क्रमांक ३ कलम ३९( १ )नुसार दोषारोप निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना पाठीशी घालणार्यांची देखील सखोल चौकशी करण्यात येईल असा इशारा संदेश सावंत व कोल्हेवाडी ग्रामस्थ यांनी दिला आहे.
ग्रामपंचायतीचे कामकाज करताना चुकीचे पध्दतीने काम करणे, कामकाजात अनियमितता, आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांनी कोल्हेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच वैदेही विजय बेंद्रे आणि तत्कालीन ग्रामसेवक चेतन दाभोळकर यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम २९५९ च्या मुंबई अधिनियम क्रमांक ३ कलम ३९( १ )नुसार दोषारोप निश्चित केला आहे.
मात्र यानंतर कोल्हेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच वैदेही बेंद्रे आणि तत्कालीन ग्रामसेवक चेतन दाभोळकर यांना इतर अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत असे कोल्हेवाडी ग्रामस्थांच्या निदर्शनात आले आहे. चुकीला माफी नाही, ज्याने चूक केली त्यांना सजा मिळालीच पाहिजे असे कोलेवाडी ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यात जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. त्यांना मोकाट सोडून दिल्यास न्याय देवतेवर विश्वास राहणार नाही. चुकीच्या कृत्याची शिक्षा ही प्रत्येकाला मिळालीच पाहिजे.तसेच जे अधिकारी ग्रामसेवक चेतन दाभोलकर यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची सुद्धा चौकशी लावण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे ग्रामसेवक चेतन दाभोलकर हे ग्रापंचायत बॉडी ला व कर्मचारी यांना न कळवता परस्पर ग्रामपंचायतीचे दप्तर घेऊन निघुन गेले. ते कोठे गेले हे कुणालाच माहीत नाही. सरपंच, उपसरपंच व अन्य सदस्य यांना याची कल्पना न देता परस्पर दप्तर कसे बाहेर घेऊन जाऊ शकतात? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला असून या प्रकरणी
विस्तार अधिकारी लोखंडे यांच्याकडे ग्रामस्थ संदेश सावंत यांनी तक्रार केली आहे.










