The Red Team was captured by the Blue Team in the Malvan Sea
सागर कवच अभियान ; सिंधुदुर्ग किनारपट्टीवर घेण्यात आला सतर्क सुरक्षा यंत्रणेचा आढावा
मालवण | प्रतिनिधी : सागर सुरक्षेचा आढावा ज्या सागर कवच अभियानांतर्गत घेतला जातो ती मोहीम शुक्रवारी मालवण किनाऱ्यावर सुरू असताना समुद्रातील सागर सुरक्षा कवच भेदून बाँब सदृश वस्तू घेऊन मालवण बंदरात घुसू पाहणाऱ्या मोहिमेतील रेड टीमला अप्सरा स्पीडनौकेवरील ब्ल्यू टीमने किल्ले सिंधुदुर्ग नजीकच्या समुद्रात पकडले. त्यांना मालवण बंदरात आणून मालवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सुरक्षेचा आढावा घेणाऱ्या या मोहिमेत किनारपट्टीवरील सुरक्षा कवच अभेद्य असल्याचे सुरक्षा यंत्रणा मार्फत दाखवून देण्यात आले आहे.
जिल्ह्याच्या सागरी हद्दीत गुरुवार पासून सागरी कवच अभियानास सुरवात झाली. पहिल्याच दिवशी देवगडच्या समुद्रात ब्ल्यू टीमने रेड टीमला पकडण्याची कार्यवाही केली. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या नेतृत्वाखाली सागरी पोलिस, सागर सुरक्षा दलाचे सदस्य, सागर सुरक्षा रक्षक यांच्या माध्यमातून येथील समुद्रात गस्त घालण्यात येत होती. यात दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान किल्ले सिंधुदुर्ग लगतच्या समुद्रात १५ वाव खोल समुद्रात एक नौका मालवणच्या बंदरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे अप्सरा नौकेस दिसून आले. त्या दिशेने जात असता त्या नौकेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अप्सरा नौकेने त्या नौकेला पकडत त्या नौकेची तपासणी केली असता ती शीतल गस्तीनौका असल्याचे दिसून आले. नौकेची तपासणी केली असता त्या नौकेवर मालक लक्ष्मण भगत, तांडेल रामदास डोर्लेकर (रत्नागिरी), निवती पोलीस कर्मचारी एम. बी. नाईक, वेंगुर्ले पोलीस कर्मचारी जी. जी. परब, प्रधान नाईक रत्नागिरी पंकज कुमार हे रेड टीमचे सदस्य आढळले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी रेड टीमचे सदस्य असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे प्रात्यक्षिक स्वरूपातीलबाँब सदृश वस्तू होती. ही वस्तू ते किल्ले सिंधुदुर्ग, रॉकगार्डन, एमटीडीसी तारकर्ली येथे ठेवण्याचा प्रयत्न होता. ब्ल्यू टीमने ही वस्तू ताब्यात घेतली.
ब्ल्यू टीममध्ये सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल साठे, राजेंद्र दळवी, हुसेन शेख, एम के. भोई,
सुशांत पवार यांचा समावेश होता. रेड टीमच्या सदस्यांना त्यांनी ताब्यात घेत येथील पोलिसांच्या स्वाधीन केले. मालवणची सागरी सुरक्षा अभेद्य असल्याचे दाखवून देण्यात आले आहे.